सरकारनं 'रद्दी-भंगार' विकून काढली चंद्रयान-3 ची किंमत! किती पैसा जमा झाला? जाणून व्हाल अवाक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 08:41 PM2023-09-12T20:41:18+5:302023-09-12T20:42:43+5:30
पुढील महिन्यात ऑक्टोबरपर्यंत, रद्दी आणि भंगारच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची रक्कम 1000 कोटी रुपयांच्याही पुढे जाऊ शकते.
सरकारनेसरकारी कार्यालयांची रद्दी आणि भंगार विकून जवळपास 600 कोटी रुपये जमवले आहेत. या विक्रीत सरकारी निरुपयोगी कागदपत्रे, फाइल्स आणि भंगार वाहने आदींचा समावेश होता. महत्वाचे म्हणजे, काही दिवसांपूर्वी इस्रोने चांद्रयान-3 चे लॉन्चिंग केले. यासाठी मोहिमेसाठीही जवळपास 600 कोटी रुपये एवढा खर्च लागल्याचे बोलले जाते. सरकारने आपले रद्दी आणि भंगार विकून, जवळपास त्या प्रोजेक्ट एवढाच पैसा उभारला आहे. न्यूज18 ने दिलेल्या एका वृत्तानुसार, हा आकडा ऑगस्टपर्यंतचा आहे. पुढील महिन्यात ऑक्टोबरपर्यंत, रद्दी आणि भंगारच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची रक्कम 1000 कोटी रुपयांच्याही पुढे जाऊ शकते.
सरकारकडून प्रशासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. दुसरी मोहीम 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर, या कालावधीत चालेल. ज्यांचा मुख्य उद्देश कार्यालयांची स्वच्छता करणे असा आहे. ही मोहीम प्रशासनातील कामाचा अनुशेष कमी करण्यासाठी हाती घेण्यात आली आहे. गेल्या वर्षीही ऑक्टोबर महिन्यात अशाच प्रकारची मोहीम हाती घेण्यात आली होती. तेव्हा सरकारने 371 कोटी रुपये जमवले होते.
सरकारने 2021 मध्ये सर्वप्रथम अशा प्रकारची स्वच्छता मोहीम चालवली होती. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात रद्द करण्यात आलेल्या कागदपत्रांतून 62 कोटी रुपये वसूल करण्यात आले होते. विविध सरकारी कार्यालयांतील स्टीलची कपाटं कमी करणे, जप्त करण्यात आलेल्या सर्व जुन्या वाहनांचा लिलाव करणे, या मोहिमेचा भाग आहे. आतापर्यंत 31 लाख अनावश्यक सरकारी फायली कॅबिनेटमधून काढण्यात आल्या आहेत. तसेच, गेल्या दोन वर्षांत 185 लाख चौरस फूट एवढी जागा रिकामी करण्यात आली आहे.
स्वच्छता मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारच्या 1.01 लाख कार्यालयांमध्ये अशी स्वच्छता मोहीम सुरू होईल. तर तिसर्या टप्प्यात सुमारे दीड लाख कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. शासनाचे सर्वच विभाग या मोहिमेत सहभाग घेत आहेत.