दरवर्षी बिहारमध्ये भरतो नवरदेवांचा बाजार; नेपाळमधूनही येतात इच्छुक; पात्रतेनुसार ठरतो सौदा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:24 AM2022-06-30T11:24:45+5:302022-06-30T11:26:05+5:30
या बाजाराला दूरवर्ती भागासह शेजारच्या नेपाळहून वर-वधू शेकडोंनी येतात. ३० जूनपासून भरणाऱ्या या बाजारासाठी नवरदेव पोहोचत आहेत. विशेष म्हणजे येथे येणारे नवरदेव पारंपरिक धोती-कुर्ता आणि पगडी परिधान करुन येतात.
विभाष झा -
पाटणा : बाजार ही संकल्पना सर्वश्रुत आहे. आठवडी बाजार, कापड बाजार, सराफा बाजार आदी बाजाराचे प्रकार आहेत. अलीकडचे मॉलही याच प्रकारात येतात. तुम्ही म्हणाल, यात काय नवीन? परंतु, बिहारच्या मिथिलांचल भागातील मधुबनी जिल्ह्यातील सौराठ सभागाछी या नावाने प्रसिद्ध असलेल्या परिसरात भरतो ; तो यापेक्षा वेगळा असून येथे दरवर्षी नवरदेवांचा बाजार भरतो.
या बाजाराला दूरवर्ती भागासह शेजारच्या नेपाळहून वर-वधू शेकडोंनी येतात. ३० जूनपासून भरणाऱ्या या बाजारासाठी नवरदेव पोहोचत आहेत. विशेष म्हणजे येथे येणारे नवरदेव पारंपरिक धोती-कुर्ता आणि पगडी परिधान करुन येतात. वधू पक्षाकडचे लोक नवरदेव पसंत करतात. सर्व काही मनजोगते असले, तर सुरु होते बोलाचाली. सोयरसंबंध निश्चित झाल्यानंतर निबंधक (नोंदणीकार) सहमती दस्तावेज लिहून घेतात. नोंदणीकार यासाठी कोणताही मोबदला घेत नाहीत; काही मोबदला देणे, हे वर-वधू पक्षाकडील मंडळीच्या स्वेच्छेवर असते. त्यानंतर ठरते लग्नाची तारीख.
येथे येणाऱ्या लोकांची राहण्याची व्यवस्था धर्मशाळेत असते. अनेक लोक हॉटेलात, काही नातेवाईकांकडे राहतात. येथे मैथिल ब्राह्मण समुदायाशी संबंधित लोकांची गर्दी असते. वर-वधुचे कूळ , गोत्र, कुंडली आणि राशीही पाहिली जाते. कोरोनाकाळात ही परंपरा बंद होती; परंतु, मागच्या वर्षी १० हजार लोक आले होते आणि ४५० वैवाहिक संबंध जुळले होते. सभागाछीमध्ये विवाह नोंदणी होते. या परंपरेची लोकप्रियता आजच्या काळातही प्रासंगिक आहे.
एक लाख रुपये होतो खर्च...
सौराठ सभा समितीचे सचिव डॉ. शेखरचंद्र झा यांनी सांगितले की, वर-वधू परिचय मेळावा आयोजनाचा खर्च समिती करते. समितीचे सदस्य आपसात वर्गणी गोळा करतात. इतर संघटनाही मदत करतात. यासाठी जवळपास एक लाख रुपयांचा खर्च येतो.