नवरदेवानं ११.५१ लाख रुपये केले परत, फक्त १ रुपया अन् श्रीफळ घेत लग्न केलं, वधू पित्याच्या डोळ्यात अश्रू!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 10:15 AM2023-02-24T10:15:27+5:302023-02-24T10:17:02+5:30
राजस्थानातील नागौर जिल्ह्यात हुडील गावात एका लग्न सोहळ्यात अनोखा प्रकार पाहायला मिळाला. नवरदेवानं 'तिलक' विधीमध्ये मिळालेले ११ लाख ५१ हजार रुपये परत केले
पाली-
राजस्थानातील नागौर जिल्ह्यात हुडील गावात एका लग्न सोहळ्यात अनोखा प्रकार पाहायला मिळाला. नवरदेवानं 'तिलक' विधीमध्ये मिळालेले ११ लाख ५१ हजार रुपये परत केले आणि हे पाहून वधूच्या पित्याचे डोळे पाणावले. नवरदेवानं शगुन म्हणून फक्त १ रुपया आणि श्रीफळ घेत लग्न मंडपात विवाहसाठी उभा राहिला आहे. ही घटना पाहून गावातील सर्वच चक्रावले आणि या लग्नाची चर्चा फक्त त्याच गावात नव्हे, तर जवळपासच्या सर्व गावात चर्चेचा विषय ठरत आहे.
जैतारण तहसीलमध्ये सांगावास तंवरोमधील ढाणी निवासी अमर सिंह तंवर यांचं लग्न २२ फेब्रुवारी रोजी नागौर जिल्ह्यातील हुडील गावातील रहिवासी प्रेम सिंह शेखावत यांची कन्या बबिता कंवर हिच्याशी झालं. लग्न सोहळ्यात मंडपात सर्व विधी होत असताना अमर सिंह यांनी वधूच्या वडिलांना सांगितलं की ते कोणत्याही प्रकारचा हुंडा घेणार नाहीत. राजपूत समाजातील लोकांसह सर्वांनी अमर सिंग तंवर यांच्या या पुढाकाराचं कौतुक केलं.
अमर सिंह तंवर यांची वरात हुडिला जिल्ह्यातील नागौरी येथे आली होती. त्यावेळी सर्व विधी पार पाडले गेले. यातील तिलक विधीमध्ये नवरदेवाला ११ लाख ५१ हजार रुपये भेट म्हणून दिले गेले. पण तंवर यांनी राजपूत समाजाला संदेश देण्याच्या उद्देशानं तिलक विधीत मिळालेली सर्व रक्कम वधूच्या वडिलांना परत दिली.
तीन पीढ्यांपासून करताहेत देशसेवा
अमर सिंह तंवर हे लष्करात सैनिक पदावर कार्यरत आहेत. त्यांचे वडील भंवर सिंह देखील लष्करात होते. अमर सिंह यांची पोस्टिंग सध्या उत्तराखंडमधील देहरादून येथे आहे. तंवर यांच्या तीन पीढ्या देशसेवा करत आहेत. अमर सिंह यांचे वडील भंवर सिंह लष्करात सुभेदार मेजर होते आणि आजोबा बहादुर सिंह यांनी १९७१ साली भारत-पाक युद्ध, १९६५ साली भारत-चीन युद्धात देशाची सेवा केली होती.
तिलकची प्रथा बंद करण्याचं केलं आवाहन
तंवर यांनी राजपूत समाज आणि इतर समस्त समाजांना तिलक प्रथेमध्ये नवरदेवाला दिल्या जाणाऱ्या पैशांची प्रथा बंद करावी असं आवाहन केलं आहे. यामुळे गरीब कुटुंबावर खूप दडपण येतं असंही ते म्हणाले. प्रेम सिंग शेखावत यांची कन्या बबीता हिच्या लग्नात जेव्हा तिलक विधीवेळी नवरदेव अमर सिंह यांनी पैसे परत केले तेव्हा तिच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तसंच लग्नाला उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी टाळ्या वाजवून यांचं स्वागत केलं.