राम मंदिराचा तळमजला तयार, पूर्वेला प्रवेशद्वार, मंदिर परिसरात आणखी काय काय? चंपत राय यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 03:29 PM2023-12-27T15:29:26+5:302023-12-27T15:29:55+5:30
Ram Mandir: सध्या देशातील धार्मिक आणि सांस्कृतिक वर्तळासह राजकीय विश्वाचं लक्षही अयोध्येकडे लागलेलं आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरामध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्याच जय्यत तयारी सध्या अयोध्येमध्ये सुरू आहे.
सध्या देशातील धार्मिक आणि सांस्कृतिक वर्तळासह राजकीय विश्वाचं लक्षही अयोध्येकडे लागलेलं आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरामध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्याच जय्यत तयारी सध्या अयोध्येमध्ये सुरू आहे. मंदिर परिसरामध्ये चार वेदांच्या सर्व शाखांचं परायण आणि यज्ञ सातत्याने सुरू आहेत. हे अनुष्ठान मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापर्यंत चालणार आहे. दरम्यान, राम मंदिराबाबत राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मंदिराच्या तळमजल्याचं काम पूर्ण झालं आहे. तसेच पहिल्या मजल्याचं बांधकाम सुरू आहे, अशी माहिती राय यांनी दिली.
चंपत राय यांनी सांगितले की, ७० एकरमध्ये पसरलेल्या भूभागाच्या उत्तर भागात मंदिराचं बांधकाम झालं आहे. हा भाग काहीसा अरुंद आहे. तरीही याच भागात मंदिराचं बांधकाम का होत आहे असा प्रश्न पडू शकतो. तर त्याचं उत्तर म्हणजे गेल्या ७० वर्षांपासून कोर्टात जो खटला सुरू होता, तो याच जमिनीबाबत होता. त्यामुळे या जागेवर तीन मजली मंदिर उभं राहत आहे. त्याचा ग्राऊंड फ्लोअर तयार झाला आहे. तर पहिल्या मजल्यावर बांधकाम सुरू आहे. त्याशिवाय मंदिराची जी मुख्य सीमा असेल तिचंही बांधकाम सुरू आहे.
मे २०२२ पासून मंदिराच्या मुख्य भागाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. राजस्थानमधील बंसी पहाडपूर येथील गुलाबी सँडस्टोनचा वापर मंदिराच्या बांधकामामध्ये करण्यात आला आहे. तसेच फ्लोअरसाठी मकराना मार्बल आणि गर्भगृहासाठी श्वेत मार्बलचा वापर करण्यात आला आहे. मंदिराच्या खालील भाग हा भरीव आहे. मंदिर आणि तटबंदीचं आयुर्मान हे एक हजार वर्षांचं असेल. त्याच्या बांधकामासाठी २२ लाख क्युबिक दगड वापरले जाणार आहेत.
चंपत राय यांनी पुढे सांगितले की, पुढच्या ७-८ महिन्यांमध्ये आणखी ७ मंदिरं बांधली जाणार आहेत. त्यामध्ये महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निषाद राज, शबरी आणि अहिल्या यांच्या मंदिरांचा समावेश आहे. त्याशिवाय मंदिर परिसरामध्ये जटायूची स्थापना करण्यात आली आहे.
या राम मंदिर परिसरामध्ये यात्रेकरू भाविकांसाठी वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामध्ये एकाच वेळी २५ हजार यात्रेकरूंना सामान ठेवण्यासाठी लॉकर, पाणी, शौचालय, रुग्णालय या सर्वांची व्यवस्था असेल. पालिकेवर ताण पडू नये यासाठी दोन सीवर ट्रिटमेंट प्लाँटरची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच झीरो डिस्चार्जची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मंदिर विजेच्या गरजेसाठीही स्वयंपूर्ण असेल. एकूण ७० एकर परिसरापैकी २० एकरमध्ये बांधकाम सुरू आहे. तर उर्वरित भागात हिरवळ आहे.
यावेळी रामललांच्या मूर्तीबाबत चंपत राय यांनी सांगितले की, ५ वर्षांच्या बालकाचं ड्रॉईंग तयार करण्यात आलं आहे. त्याची ललाटेपर्यंतची उंची ५१ इंच असेल. देवत्व आणि बालसुलभता ज्या मूर्तीमध्ये दिसेल, त्या मूर्तीची निवड होईल. कर्नाटकमधील दगडापासून दोन मंदिरं उभारली जात आहेत. तर एक मंदिर मकराना दगडापासून बांधलं जात आहे. दक्षिण बाजूला हनुमंत असलील. तर पूर्वेला प्रवेशद्वार असेल. जिथून दिव्यांगासाठी खास व्यवस्था केलेली असेल.