अंधश्रद्धेचा कळस! ४ वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या मुलाचा आत्मा नेण्यासाठी रुग्णालयात आले २४ नातेवाईक, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 14:54 IST2025-01-28T14:54:12+5:302025-01-28T14:54:54+5:30
Rajasthan News: राजस्थानमधील कोटा शहरामध्ये अंधश्रद्धेचा कळस म्हणावी अशी घटना नुकतीच समोर आली. येथील एमबीएस रुग्णालयामध्ये ४ वर्षांपूर्वी उपचारांदरम्यान, मृत्यू झालेल्या मुलाचा आत्मा नेण्यासाठी त्याचे नातेवाईक आले. मात्र बुंदी येथून आलेल्या या नातेवाईकांना पोलिसांनी रुग्णालयात प्रवेश करण्यास मनाई केली.

अंधश्रद्धेचा कळस! ४ वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या मुलाचा आत्मा नेण्यासाठी रुग्णालयात आले २४ नातेवाईक, त्यानंतर...
राजस्थानमधील कोटा शहरामध्ये अंधश्रद्धेचा कळस म्हणावी अशी घटना नुकतीच समोर आली. येथील एमबीएस रुग्णालयामध्ये ४ वर्षांपूर्वी उपचारांदरम्यान, मृत्यू झालेल्या मुलाचा आत्मा नेण्यासाठी त्याचे नातेवाईक आले. मात्र बुंदी येथून आलेल्या या नातेवाईकांना पोलिसांनी रुग्णालयात प्रवेश करण्यास मनाई केली. त्यामुळे त्यांनी रुग्णालयाच्या दारावरच गोंधळ घातला. अखेर पोलिसांनी कारवाई करत यापैकी काही जणांना अटक केली.
चार वर्षांपूर्वी रुग्णालयात मृत्यू झालेल्या त्या मुलाचं नाव मनराज असल्याचं समोर आलं आहे. त्याचा आत्मा नेण्यासाठी हे नातेवाईक रुग्णालयात आले होते. मात्र त्यांना रुग्णालयात प्रवेश नाकारण्यात आल्याने त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांनी यापैकी ३ जणांना अटक करून तुरुंगात पाठवले. मिळालेल्या माहितीनुसार बुंदी येथील डापटा पंचायतीमधील झाडगंज येथील रहिवासी असलेल्या मनराज याचा चार वर्षांपूर्वी एमबीएस रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्याचा आत्मा नेण्यासाठी मंगळवारी सकाळी सुमारे २४ हून अधिक नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
दरम्यान, रुग्णालयाच्या दरवाजावर पूजा केल्यानंतर त्यापैकी एका महिलेने चित्रविचित्र वागण्यास सुरुवात केली. तेव्हा सोबत आलेल्या लोकांनी या महिलेच्या शरीरामध्ये देवतांनी प्रवेश केल्याचे सांगितले. मुलाचा आत्मा हा याच रुगालयात आहे, तसेच तंत्रसाधनेच्या माध्यमातून आम्ही तो घेऊन जाऊ असा दावा त्यांनी केला. त्यानंतर हे सर्वजण रुग्णालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र रुग्णालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांनी रोखले. मात्र त्यापैकी काही जण जबरदस्तीने रुग्णालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे त्यांनी खूप गोंधळ घातला. अखेर पोलिसांनी यापैकी ३ जणांना अटक केली.
या रुग्णालयामध्ये अशा प्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर येथे वारंवार असे प्रकार घडत असतात, अशी माहिती समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी काही लोक मृत्यू झालेल्या आपल्या मुलाचा आत्मा नेण्यासाठी येथे पोहोचले होते.