"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 17:38 IST2025-04-23T17:37:45+5:302025-04-23T17:38:13+5:30
Pahalgam Terror Attack : या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण जखमी असल्याचे समजते.

"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जग हादरले आहे. या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण जखमी असल्याचे समजते. महत्वाचे म्हणजे, त्या कट्टरपंथी दहशतवाद्यांनी धर्म विचारून, कलमा पढायला सांगून, या निष्पाप पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यानंतर आता, भारतातीलइस्रायलच्या राजदूताने दहशतवाद्यांसंदर्भात स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात बोलताना, हा भ्याड हल्ला असून दहशतवादी आपल्याला भयभीत करण्यासाठी आणि धमकावण्यासाठी नेहमीच नवीन मार्ग शोधत असतात. अशा परिस्थितीत, दहशतवादी कसा विचार करतात आणि कशा पद्धतीची कृती करतात? हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. या परिस्थितीचा सामना कसा करायचा? हे भारत सरकार ठरवेल. मात्र, आपण याचा अधिक मजबुतीने सामना करू, असा मला विश्वास आहे. यांचा सामना कसा करायचा हे भारत सरकारला ठाऊक आहे. यासंदर्भात आम्ही मोठ्या प्रमाणावर भारताचे सहकार्य करण्याचा प्रयत्न करू," असे इस्रायलचे भारतातील राजूदत रेउवेन अझार (Reuven Azar) यांनी म्हटले आहे.
अझार पुढे म्हणाले, "भारताने दहशतवादाचा सामना कसा करावा, हे सांगणे आमचे काम नाही. भारताकडे अत्यंत चांगल्या प्रकारचे इंटेलिजन्स आहे. यामुळे, या परिस्थितीचा सामना कसा करायचा? हे भारताला चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि आम्ही सहकार्यासाठी तयार आहोत.
तत्पूर्वी, पहलगाम मधील कृर दहशतवादी हल्ल्यामुळे अत्यंत दुःखी आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी इस्रायल, भारतासोबत उभा आहे, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले होते. तसेच, इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गेडेन सार यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे.