'द काश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना वाय दर्जाची सुरक्षा; गृह मंत्रालयाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 12:22 PM2022-03-18T12:22:28+5:302022-03-18T12:35:49+5:30
अग्निहोत्रींच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय
नवी दिल्ली: सध्या सर्वत्र गाजत असलेल्या, चर्चेत असलेल्या 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. गुप्तचर खात्यानं दिलेल्या अहवालानंतर गृह मंत्रालयानं अग्निहोत्रींना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. विवेक अग्निहोत्री देशात कुठेही गेले तरीही त्यांच्यासोबत सीआरपीएफचे जवान असतील.
Film director Vivek Agnihotri has been given 'Y' category security with CRPF cover pan India: Government Sources
— ANI (@ANI) March 18, 2022
(File photo) pic.twitter.com/63l1B0BlMz
वाय दर्जाच्या सुरक्षा पुरवल्या जाणाऱ्या व्यक्तीसोबत एकूण ८ सुरक्षारक्षक असतात. व्यक्तीच्या घराबाहेर पाच शस्त्रसज्ज सुरक्षारक्षक तैनात असतात. याशिवाय तीन शिफ्टमध्ये तीन पीएसओ सुरक्षा प्रदान करतात.
चित्रपटावरून राजकारण तापलं
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स चित्रपटात काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट पाहून अनेकजण भावुक झाले. काहींना अश्रू अनावर झाले. या चित्रपटावरून राजकारणही जोरात सुरू आहे. काहींनी चित्रपटाला विरोधही दर्शवला आहे.
बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई
चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. ६ दिवसांत चित्रपटानं ८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. अनेक राज्यांनी चित्रपट करमुक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चित्रपटाचं कौतुक केलं आहे. चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात काही बॉलिवूड कलाकारांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.