The Kashmir Files: 'द काश्मीर फाईल्स'वरुन 'या' शहरात गोंधळ! महिन्याभरासाठी कर्फ्यू लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 10:39 AM2022-03-22T10:39:14+5:302022-03-22T10:39:23+5:30
The Kashmir Files: जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या या आदेशाविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून, उद्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोटा: सध्या देशभरात काश्मीरमधील नरसंहारावर आधारीत 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. काहीजण या चित्रपटाच्या बाजूने आहेत, तर काहीजण याच्या विरोधात. दरम्यान, राजस्थानमधीलकोटा (Kota) जिल्ह्यातही हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी 22 मार्च ते 21 एप्रिल या कालावधीत कलम 144(कर्फ्यू) लागू केला आहे.
पुढील एक महिन्यांच्या काळात चेती चंद, महावीर जयंती, गुड फ्रायडे, बैसाखी, जुमा-तुल-विडा इत्यादी सण आहेत. या सणांच्या काळात काही चुकीचा प्रकार घडू नये, म्हणूनच हे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राजूकमार सिंह यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, या एका महिन्याच्या काळात मेळावे, आंदोलन, मिरवणूक, पदयात्रा यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कोविड लसीकरण आणि पोलीस कार्यक्रमांसारख्या सरकारी कामांना लागू होणार नाही, असेही अधिकृत आदेशात म्हटले आहे.
'चंडी मार्चला कोणीही रोखू शकत नाही'
दरम्यान, कोटा उत्तर पूर्वचे भाजप आमदार प्रल्हाद गुंजाळ यांनी कलम 144 लागू करण्याच्या आदेशावरुन सरकारवर निशाणा साधला. "मंगळवारी कोटा उत्तर विधानसभा मतदारसंघात एक विशाल 'चंडी मार्च' काढण्यात येणार आहे. त्यामुळेच कलम 144 लागू करण्यात आलाय, 'काश्मीर फाईल्स' हे फक्त एक निमित्त आहे. राज्यात महिला बलात्कार होताहेत. एका मंत्र्याने राजस्थानचे वर्णन 'पुरुषांचे राज्य' असे केले, यामुळे महिलांचा स्वाभिमान दुखावला. त्यामुळे उद्या चंडी मार्चचे आयोजन करण्यात आले आहे आणि हा मार्च निघणारच. पोलिसांनी लाठीमार केला किंवा अटक केली तरी उद्याचा 'चंडी मार्च' रोखू शकत नाही,'' असे ते म्हणाले.
काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावर आधारित चित्रपट
11 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, त्रिपुरा, गोवा, उत्तराखंड या अन्य राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. हा चित्रपट 1990 मध्ये झालेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावर आधारित असून, विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी यापूर्वी, 'ताश्कंद फाईल्स', 'हेट स्टोरी' आणि 'बुद्धा इन ए ट्रॅफिक जॅम' सारखे चित्रपट बनवले आहेत.