म्हणे, मुलांनाही सॅनिटरी नॅपकिन वाटले! बिहारमधील सरकारी शाळेतील घोटाळ्याचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 06:16 AM2022-01-23T06:16:33+5:302022-01-23T06:17:11+5:30
बिहारच्या सारण जिल्ह्यातील एका शाळेत चक्क मुलांनाही सॅनिटरी नॅपकिनचे वाटप झाल्याची नोंद आढळल्याने खळबळ उडाली आहे.
एस.पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : बिहारच्या सारण जिल्ह्यातील एका शाळेत विद्यार्थिनींबरोबरच चक्क विद्यार्थ्यांनाही सॅनिटरी नॅपकिनचे वाटप झाल्याची नोंद आढळल्याने खळबळ उडाली आहे. एका सरकारी शाळेत या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे.
संबंधित शाळेत नवीन मुख्याध्यापकांनी पदभार घेतला व जुन्या योजनांचे उपयोगिता प्रमाणपत्र मागण्यात आले तेव्हा एक कोटीच्या योजनांमध्ये घोटाळा उघडकीस आला. त्यांनी या प्रकाराची चौकशी सुरू केली. माजी मुख्याध्यापकांनी तयार केलेल्या अहवालानुसार शाळेतील विद्यार्थ्यांनाही सॅनिटरी नॅपकिनची गरज पडते, अशी नोंद आढळली. त्यामुळे त्यांच्या खात्यांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व पोषाख योजनेचा लाभ देण्यात आला. शिक्षण खात्याने नवीन मुख्याध्यापकांकडे जुन्या योजनांचे उपयोगिता प्रमाणपत्र मागितले तेव्हा एक कोटीच्या योजनांचे प्रमाणपत्रच जमा करण्यात आलेले नाहीत, ही धक्कादायक बाब पुढे आली.