राजदचे नेते करू लागले नितीशकुमारांची पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 06:16 AM2022-09-18T06:16:38+5:302022-09-18T06:17:36+5:30
भ्रष्टाचार, सुशासनाचा केला पर्दाफाश
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महाआघाडी सरकारची स्थापना केल्यानंतर त्यांच्या अडचणी मात्र कमी होत नसल्याचे दिसत आहे. राजदच्या कोट्यातून मंत्री बनलेल्या नेत्यांकडून नितीशकुमार सरकारवर सातत्याने टीका होत आहे. हे नेते सरकारमधील भ्रष्टाचाराबाबत नितीशकुमार यांना आरसा दाखविण्याचे काम करत आहेत.
राज्याचे कृषिमंत्री सुधाकर सिंह यांनी आपल्या विभागातील भ्रष्टाचाराबाबत जी विधाने केली त्यामुळे नितीशकुमार सरकारसमोर नव्या अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. हे प्रकरण शांत होत नाही तोच राजद कोट्यातील सहकारमंत्री सुरेंद्र यादव यांच्यासमोर राजदच्याच एका नेत्याने सुशासनाचा पर्दाफाश केला. वैशाली जिल्हा बँकेचे अध्यक्ष विष्णुदेव राय यांनी भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे. आपल्याच बँकेतील भ्रष्टाचाराच्या काही प्रकरणाचा त्यांनी उल्लेख केला. अधिकाऱ्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, कोंबडीचे अंडे खाल्ले तर ठीक आहे. मात्र, येथे जिल्ह्यातील अधिकारी कोंबडीच खाऊन बसले.
जिल्हा बँकेचे अधिकारी आणि बँकेचे मुख्य संचालक मिळून गरीब जनतेचा पैसा लुटत आहेत. सहकारी बँकेच्या १५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा खुलासा बैठकीत झाला. अधिकाऱ्यापासून ते सरकारमधील मोठ्या पदावरील लोकांपर्यंत या प्रकरणावर कोणीही बोलत नाही.
विष्णुदेव राय हे राजदचे नेते आहेत. त्यामुळे मंत्री सुरेंद्र यादव यांनी त्यांचे हे आरोप गांभीर्याने घेतले आहेत. ही माहिती राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना देऊ, असे मंत्र्यांनी सांगितले.