मिनिस्टर इन वेटिंगची यादी संपता संपेना; मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 07:56 AM2023-01-12T07:56:33+5:302023-01-12T08:13:49+5:30
१७ जानेवारीनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत भाजप नेत्यांबरोबरच इतर पक्षांतून भाजपमध्ये सहभागी झालेले नेते व सहयोगी दलांचे नेत्यांमध्येही उत्सुकता आहे.
- संजय शर्मा
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक व दहा राज्यांतील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन होणाऱ्या मोदी सरकारच्या अंतिम फेरबदलात मंत्री होण्यासाठी मिनिस्टर इन वेटिंगची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नेत्यांच्या कामकाजावर पूर्णपणे राजकारणाची मजबुरी स्पष्टपणे दिसत आहे.
१७ जानेवारीनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत भाजप नेत्यांबरोबरच इतर पक्षांतून भाजपमध्ये सहभागी झालेले नेते व सहयोगी दलांचे नेत्यांमध्येही उत्सुकता आहे. हा फेरबदल २०२४ पूर्वी होणारा अंतिम फेरबदल मानला जात आहे. भाजपच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या नेत्याला सध्या मोदी मंत्रिमंडळापासून भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नव्या टीममध्ये सहभागी होण्याची आशा आहे. ज्या राज्यांत निवडणुका होणार आहेत, त्या नागालँड, मेघालय, त्रिपुरा, कर्नाटक, मिझोराम, जम्मू-काश्मीर, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थानच्या नेत्यांनाही याबाबत शक्यता दिसते.
ते फक्त मोदींनाच माहिती
कोण मंत्री होणार, कोण नाही होणार आणि मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार, हे फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच माहिती आहे. परंतु संभाव्य मंत्र्यांच्या प्रदेशवार नेत्यांच्या नावांवर भाजपमध्ये विचारविनिमय सुरू झाला आहे. १७ जानेवारीला दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सर्व प्रदेशाध्यक्ष व संघटन महामंत्र्यांची दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याबरोबर स्वतंत्र बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यांकडूनही राजकीय कारणांसाठी पक्षासाठी गरजेच्या असलेल्या संभाव्य नेत्यांची नावे मागितली जातील.