सहा दिवसांच्या बाळाचे यकृत 13 महिन्यांच्या बाळाला; दोघांचे प्राण वाचले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 11:09 AM2024-10-01T11:09:19+5:302024-10-01T11:19:08+5:30
गेल्या आठवड्यात सुरत येथील डायमंड रुग्णालयात एका बाळाला (मुलगी) दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना शुक्रवारी बाळ मेंदूमृत झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या आठवड्यात सुरत येथील अवघ्या सहा दिवसांच्या मेंदूमृत बाळामुळे दोघांचे प्राण वाचले, तर एकाला दृष्टी मिळाली. या बाळाच्या दोन किडन्या, यकृत आणि दोन डोळे दान करण्यात आले. बाळाचे यकृत विलेपार्ले येथील नानावटी मॅक्स रुग्णालयातील १३ महिन्यांच्या बाळाला देण्यात आले असून, प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही करण्यात आली.
गेल्या आठवड्यात सुरत येथील डायमंड रुग्णालयात एका बाळाला (मुलगी) दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना शुक्रवारी बाळ मेंदूमृत झाले. त्यानंतर त्याच्या पालकांना समुपदेशकांनी अवयवदानाविषयी माहिती दिल्यानंतर पालकांनी अवयवदानास संमती दिली.
डोळे आणि किडनी अहमदाबाद येथील रुग्णालयातील प्रतीक्षा यादीवरील रुग्णांना देण्यात आले, तर यकृत मुंबईतील नानावटी मॅक्स रुग्णालयात आणण्यात आले.
रेल्वेने आणले यकृत
शनिवारी सकाळी पहाटे बाळाचे यकृत हवाईमार्गे मुंबईला आणणे शक्य नव्हते. त्यामुळे रविवारी पहाटे पाचच्या राजधानी एक्स्प्रेस पकडण्यात आली.
सकाळी ७.१५ वाजता बोरिवली येथे यकृत पोहोचले. त्यानंतर ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने विलेपार्ले येथील रुग्णालयात हा अवयव आणण्यात आला. रुग्णालयातील १३ महिन्यांच्या मुलावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. या मुलाला दोन महिन्यांपासून यकृताचा आजार होता.
१० तास चालली शस्त्रक्रिया
रुग्णाचे वय पाहता मायक्रोस्कोपिक सर्जरी करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेकरिता १० तास लागले. या मुलाची प्रकृती स्थिर असून, शस्त्रक्रिया चांगली झाली असल्याचे लिव्हर, इन्टेस्टाईन आणि पॅनक्रिया ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक डॉ. अनुराग श्रीमल यांनी सांगितले.