नोटा मोजण्यासाठी मागवाव्या लागल्या मशीन, कोट्यवधीच्या नोटा घेऊन पोलीस माध्यमांसमोर, नेमका प्रकार काय? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 08:56 AM2023-07-08T08:56:09+5:302023-07-08T08:56:42+5:30
Crime News: गुजरातमधील कारचालक मयूरसिंह जडेजा आणि त्यांचा सहकारी जगतसिंह जडेजा यांच्याकडून २१ जून रोजी करण्यात आलेल्या ५ कोटी रुपयांच्या लुटीसंदर्भात पोलिसांनी शुक्रवारी महत्त्वपूर्ण उलगडा केला आहे.
गुजरातमधील कारचालक मयूरसिंह जडेजा आणि त्यांचा सहकारी जगतसिंह जडेजा यांच्याकडून २१ जून रोजी करण्यात आलेल्या ५ कोटी रुपयांच्या लुटीसंदर्भात पोलिसांनी शुक्रवारी महत्त्वपूर्ण उलगडा केला आहे. या प्रकरणी तपास करत असलेल्या एसआयटीने या संदर्भात सहा जणांना अटक केली आहे. एसआयटीने लुटलेल्या रकमेतील सुमारे ३ कोटी २४ लाख १५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. एसपी अमित रेणू यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.
जप्त करण्यात आलेली ३ कोटी २४ लाख १५ हजार रुपयांची रक्कम मोठ्या खोक्यांमध्ये भरून माध्यमांसमोर आणण्यात आली. नोटा मोजण्यासाठी एसआयटीने बँकांची मदत घेऊन नोटा मोजणाऱ्या मशीन मागवल्या होत्या. लुटीची धक्कादायक घटना घडल्यानंतर एसपी अमित रेणू यांनी ३६ अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि टेक्निकल सेलची टीम बनवली होती. त्यानंतर एसआयटीने वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत सहा जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ८ मोबाईल, क्रेटा आणि एक एसयूव्ही वावह जप्त करण्यात आल्या होत्या.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये धनबाद येथील गोविंदपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील राजेश सिंह, अमलाटांड येथील करीम अंसारी, अमरपूर येथील विनोद विश्वकर्मा, फकीरडीह येथील शाहजाद आलम, हजारीबाग येथील रंजीत कुमार आणि चतरा येथील अजित सिंह यांचा समावेश होता. पत्रकार परिषदेत पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्वप्रथम रंजीत कुमार याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १.१४ कोटी रुपये जप्त करण्यात आले. त्यानंतर रंजितने दिलेल्या माहितीवरून इतर ५ जणांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील चालक मयूरसिंह जडेजा त्याचा सहकारी जगतसिंह जडेजा याच्यासोबत पाटणा येथील डीवाय कंपनीचे व्यवस्थापक भरत सिंह सोलंकी यांनी दिलेल्या सूचनेनुसार पाटणा येथून कोलकाता येथे ५ कोटी रुपये घेऊन जात होता. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चालकाने आपल्या क्रेटा कारमध्ये गुप्त सेल्फ बनवून ५ कोटी रुपये त्यामध्ये ठेवले. मात्र त्यानंतरही ते दरोडेखोरांच्या निशाण्यावर आले. आरोपी गुलाब सिंह याने त्याच्या टोळक्यासह त्यांना जीटी रोडवर रिकव्हरी एजंट असल्याचे सांगत अडवले. गाडीत मोठी रक्कम असल्याचे समजल्यावर त्यांनी जमुआ येथील बाटी येथे लुटीची योजना आखली. त्यानंतर बाटी येथे या कारला ओव्हरटेक करत पाच कोटी रुपयांची रक्कम लुटून आरोपी फरार झाले होते.