भारतीय वाद्यांची जगावर जादू! विदेशात मागणी वाढली; हार्मोनियम, तबल्याची सर्वाधिक निर्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 08:13 AM2022-11-08T08:13:07+5:302022-11-08T08:13:19+5:30
गेली दोन वर्षे कोरोना साथीच्या काळात लॉकडाऊन, तसेच प्रवासावर असलेले निर्बंध यामुळे कंटाळलेल्या लोकांचा संगीत शिकण्याकडे व इतर छंद जोपासण्याकडे कल वाढला.
नवी दिल्ली :
गेली दोन वर्षे कोरोना साथीच्या काळात लॉकडाऊन, तसेच प्रवासावर असलेले निर्बंध यामुळे कंटाळलेल्या लोकांचा संगीत शिकण्याकडे व इतर छंद जोपासण्याकडे कल वाढला. त्याच्या परिणामी कोरोनाच्या काळात सतार, तानपुरा, हार्मोनियम, तबला आदी वाद्यांची भारतातून होणारी निर्यातही वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
विदेशामध्ये लॉकडाऊनमध्ये घरातून काम करणाऱ्या लोकांनी आपल्या छंदांकडेही लक्ष दिले. त्यांनी भारतीय वाद्यांची मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन खरेदी केली.
केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी २६ ऑक्टोबरला केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत भारतातील निर्यातीचे प्रमाण २०१३ मध्ये याच कालावधीत झालेल्या निर्यातीच्या तुलनेत ३.५ पट अधिक आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिट्विट करत म्हटले होते की, भारतीय वाद्यांना जगभरात मोठी मागणी आहे. भारतीय संगीताची लोकप्रियता जगभरात वाढत असून, या क्षेत्राचा विस्तार होण्यासाठी आणखी संधी उपलब्ध आहेत.
२०२०-२१मध्ये २८७ कोटींची उलाढाल वाद्यांच्या निर्यातीतून
२०१९-२० या वर्षी भारताने १९५.५२ कोटी रुपयांच्या संगीत वाद्यांची निर्यात केली होती. २०२०-२१ साली हा आकडा घसरून १८७.१४ कोटींवर आला. मात्र, २०२१-२२ या वर्षी कोरोनाच्या काळात भारतातून २८७.४५ कोटी रुपयांच्या भारतीय वाद्यांची निर्यात झाली. दिल्लीतील रिखी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कंपनीचे मालक अजय रिखीराम म्हणाले की, भारतीय वाद्यांच्या निर्यातीत झालेली वाढ उत्साहवर्धक आहे.
गिटारची भारतात लक्षणीय आयात
अजय रिखीराम म्हणाले की, पाश्चिमात्य वाद्यांतील गिटार या वाद्याची भारतातील आयात कोरोना साथीच्या काळात वाढली.
भारतातून निर्यात केलेल्या सतारची किंमत ७५ हजार ते ३.५ लाख रुपयांच्या, तर तानपुऱ्याची किंमत २५ हजार ते १.२५ लाख रुपयांच्या दरम्यान होती. भारतीय वाद्यांना अमेरिका व युरोपमधून सर्वाधिक मागणी होती.