संसदेत गोंधळ घालणाऱ्या एका तरुणाचं महाराष्ट्र कनेक्शन, या जिल्ह्यातील आहे रहिवासी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 01:56 PM2023-12-13T13:56:46+5:302023-12-13T13:57:48+5:30
Parliament winter session 2023: लोकसभा आणि संसद भवन परिसरात गोंधळ घालणाऱ्या एका तरुणाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. अमोल शिंदे असं या तरुणाचं नाव असून, तो महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आज लोकसभेमध्ये धक्कादायक घटना घडली असून, दोन तरुणांनी संसदेची कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमधून सभागृहात उड्या मारल्या. तसेच तानाशाही नही चलेगी अशा घोषणा देत गोंधळ घातला. या तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच संसदेच्या आवारातही एका तरुणाने स्मोक कँडल पेटवून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यापैकी एका तरुणाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. अमोल शिंदे असं या तरुणाचं नाव असून, तो महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दोन तरुण आणि एक तरुणी अशा तिघांनी लोकसभा आणि संसदेच्या आवारात हा गोंधळ घातला असून, त्यांनी म्हैसूरचे खासदार प्रताप सिंह यांच्या नावाने पास बनवू संसदेत प्रवेश मिळवल्याची माहिती समोर आली आहे. संसदेत गोंधळ घालणाऱ्या एका तरुणाचं नाव सागर असं असल्याची माहिती काही खासदारांनी दिली आहे. तर त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचं नाव नीलम सिंह असून, ती हरियाणातील हिसारमधील असल्याची माहिती समोर येत आहे. तर तिसरा अमोल शिंदे हा तरुण महाराष्ट्रातील लातूर येथील असल्याचे समोर आले आहे.
याबाबत माहिती देताना काँग्रेस खासदार अधीररंजन चौधरी यांनी सांगितले की, दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. त्यांनी काही वस्तू फेकल्या. त्यातून धूर येत होता. मात्र या तरुणांना खासदारांनी पकडले आणि सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिले. संसदेच्या सुरक्षेमधील ही गंभीर चूक आहे असा आरोपही अधीररंजन चौधरी यांनी केला.