‘सबका साथ, सबका विश्वास’ मंत्र संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 05:42 AM2023-09-10T05:42:03+5:302023-09-10T05:42:35+5:30
पंतप्रधान मोदी : वर्तमान आणि भावी पिढ्यांसाठी ठोस उपायांवर भर देऊया !
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना संकटावेळी जगभरात विश्वासाचा मोठा अभाव जाणवला. युक्रेन युद्धावेळी तो अधिकच वाढला. परंतु आपण सर्वांनी मिळून कोरोनावर मात केली, त्याप्रमाणेच सर्वांनी एकत्रित येत ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ हा मंत्र आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० परिषदेच्या प्रारंभीच्या सत्रात व्यक्त केले.
भारताच्या अध्यक्षतेखालील जी-२० शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत सुरूवात झाली. उद्घाटन सत्राच्या प्रारंभी अध्यक्ष या नात्याने पंतप्रधान मोदी यांनी परिषदेला संबोधित केले. जगापुढे सध्या अनेक आव्हाने आहेत. त्यात जागतिक अर्थव्यवस्थेतील उलथापालथ, उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम देशांमधील यांच्यातील दुरावा, अन्न, इंधन आणि खतांचे व्यवस्थापन, दहशतवाद, सायबर सुरक्षा, आरोग्य, ऊर्जा, जलसुरक्षेसह वर्तमान आणि भावी पिढ्यांसाठी ठोस आणि शाश्वत उपायांवर भर दिला पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.
अडीच हजार वर्षांपूर्वी दिला मानवतेचा संदेश
nसंबोधनावेळी पंतप्रधान म्हणाले, सध्या आपण ज्या ठिकाणी जमलो आहोत, तिथून काही किलोमीटर अंतरावर सुमारे अडीच हजार वर्षे जुना स्तंभ आहे.
nत्यावर प्राकृत भाषेत लिहिले आहे, ‘हेवम लोकसा हितमुखे ति, अथ इयम नातिसु हेवम’ अर्थात मानवतेचे कल्याण आणि सुख नेहमीच सुनिश्चित करायला हवे, असे त्या स्तंभावर नमूद केले आहे.
nया संदेशाचे स्मरण करत आपण जी-२० शिखर संमेलनाचा शुभारंभ करुया. २१ वे शतक हे जगाला नवी दिशा देणारे आहे.
nत्यासाठी मानवकेंद्री दृष्टिकोनासह आपले दायित्व पार पाडत पुढे जाऊया, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.
कोट्यवधी सहभागी
भारताचे अध्यक्षपद हे ‘सबका साथ, सबका विकास’चे प्रतीक झाले आहे. देशातील ६०हून अधिक शहरांमध्ये २००हून अधिक बैठका झाल्या. कोट्यवधी लोक त्यात सहभागी झालेत.
‘वसुधैव कुटुंबकम’ ही मानवकेंद्रित
विकासाची जागतिक ब्लू प्रिंट : राष्ट्रपती
nभारताच्या जी-२० अध्यक्षपदाची संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकम - एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही शाश्वत, सर्वसमावेशक व मानवकेंद्रित विकासाची जागतिक ब्लू प्रिंट (आराखडा) आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी म्हटले.
nमुर्मू यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, नवी दिल्लीत १८ व्या जी-२० शिखर परिषदेत सहभागी होत असलेल्या जी-२० देशांचे प्रमुख, पाहुणे देश व आंतरराष्ट्रीय संघटनांचे हार्दिक स्वागत आहे.
nजी-२० शिखर परिषदेत सहभागी सर्वांच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ हा दृष्टिकोन वास्तवात आणण्याच्या प्रयत्नांना मी यश चिंतिते. भारत आपल्या जी-२० अध्यक्षपदाच्या काळात सर्वसमावेशक वाढ, डिजिटल नवोपक्रम, हवामान लवचीकता आणि जागतिक आरोग्य यासारख्या विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत आहे.
परिषदेत सर्वत्र ‘भारत’च !
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी भारत मंडपममध्ये उद्घाटनपर भाषण केले. यावेळी माेदींच्या समाेरील फलकावर देशाचे नाव ‘इंडिया’ नव्हे तर इंग्रजी अक्षरांमध्ये ‘भारत’ असे लिहिले हाेते.
यापूर्वीच्या जी-२० परिषदांमध्ये त्यांच्यासमाेर ‘इंडिया’ असे लिहिलेले हाेते. प्रथमच एका आंतरराष्ट्रीय समाराेहात देशाचे नाव ‘इंडिया’ असे लिहिण्यात आलेले नाही. राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांनी भाेजनासाठी दिलेल्या निमंत्रणात सर्वप्रथम ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ अस उल्लेख झाला. त्यानंतर ‘भारत’ या नावावरून चर्चा सुरू झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘भारता’चे नेते अशीच ओळख करून देण्यात आली आहे. ‘इंडिया’ हा शब्द कटाक्षाने बाजूला ठेवण्यात आला आहे. जी-२० च्या सर्व अधिकृत दस्तावेजात ‘इंडिया’ शब्द टाळून केवळ ‘भारत’ शब्द वापरण्यात आला आहे.
डोळ्यावर काळी पट्टी बांधून आले जर्मनीचे चान्सलर
जर्मनीचे चांसलर ओलाफ शोल्झ शनिवारी जी-२० परिषदेत उजव्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून सहभागी झाले. गेल्या आठवड्यात बर्लिनजवळील पॉट्सडॅम येथे जॉगिंग करताना त्यांना दुखापत झाली होती. त्यांच्या प्रवक्त्यानुसार, स्कोल्झ यांना किरकोळ दुखापत झाली असून, पुढील काही दिवस डोळ्यांवर पट्टी बांधावी लागेल.
कोल्हापुरी चप्पल, पैठणीची शान अन् चंद्रयान ३
जी-२० परिषदेसाठी भारत संपूर्ण जगाला आपली संस्कृती, इतिहास, खाद्यपदार्थ आणि पेहराव यांची ओळख करून देत आहे. भारत मंडपममधील हॉल नंबर ३ मध्ये खास क्राफ्ट्स बाजार भरवला. यात जागतिक स्तरावर प्रसिद्ध महाराष्ट्राची शान कोल्हापुरी चप्पल आणि पैठणी साडीच्या स्टॉलने सर्वांचेच लक्ष वेधले. बिहारच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शांती देवी यांची ‘चंद्रयान-३’वरील मधुबनी पेटिंगदेखील लक्षवेधी ठरली. विविध देशांचे राष्ट्रप्रमुख आणि इतर पाहुण्यांसमोर प्रदर्शन केल्याने या उद्योगांना चांगली चालना मिळेल.