जमावाने दोन धार्मिक स्थळे जाळली; हरयाणातील हिंसाचारात मृतांची संख्या सात; पंचायतीवर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 08:16 AM2023-08-04T08:16:22+5:302023-08-04T08:17:07+5:30
नूहमध्ये कर्फ्यू असतानाही काही लोकांनी २ धार्मिक स्थळे जाळली. पलवलमध्ये तीन दुकाने, दोन धार्मिक स्थळांना आग लागली. यानंतर पोलिसांनी २६५ जणांविरुद्ध पाच गुन्हे नोंदवले आहेत.
बलवंत तक्षक -
चंडीगड : हरयाणातील नूह येथे उसळलेल्या हिंसाचारात मृतांची संख्या ७ झाली आहे. दरम्यान, मानेसरमध्ये होणाऱ्या पंचायतीला प्रशासनाने बंदी घातली आहे. हिंसाचारानंतर परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असून, अनेक जिल्ह्यांत निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे.
नूहमध्ये कर्फ्यू असतानाही काही लोकांनी २ धार्मिक स्थळे जाळली. पलवलमध्ये तीन दुकाने, दोन धार्मिक स्थळांना आग लागली. यानंतर पोलिसांनी २६५ जणांविरुद्ध पाच गुन्हे नोंदवले आहेत.
कार चालकाचा शोध...
नूह दंगलीत हल्लेखोरांचे नेतृत्व करणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारच्या चालकाचा पोलिस शोध घेत आहेत. या गाडीवर ‘पीबी ३१, डब्ल्ल्यू ४८३१’ असा क्रमांक लिहिला आहे. ती कार माजी सैनिकाच्या नावावर आहे.
अधिकाऱ्याने वाचवले ३५ जणांचे प्राण
- मुबारिकपूर गावात राहणारा आबिद हुसेन अधिकारी आहेत. ते नूह बसस्थानकाजवळ फौजदार ओंबीर यांच्यासोबत उभे होते. तेव्हाच त्यांना माहिती मिळाली की, काही समाजकंटकांनी मिरवणुकीत सहभागी काही लोकांना ओलीस करून एका धार्मिकस्थळी कोंडून ठेवले आहे.
- माहिती मिळताच ते ओंबीर आणि इतर पोलिसांसह पोहोचले. ते पोहोचताच हल्लेखोरांनी दगडफेक आणि गोळीबार सुरू केला. ओलिसांना वाचवण्यासाठी आबिद हुसेन धावले. काही मिनिटांचाही उशीर झाला असता तर किमान ३५ जणांचा जीव धोक्यात होता.