संसदेचे पावसाळी अधिवेशन चार दिवस आधीच गुंडाळले; गेल्या १६ दिवसांत सात विधेयके मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 07:28 AM2022-08-09T07:28:00+5:302022-08-09T07:28:16+5:30
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या कारकिर्दीची मुदत येत्या बुधवारी, १० ऑगस्ट रोजी संपत आहे.
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधीच सोमवारी गुंडाळण्यात आले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्या सभागृहाचे व मावळते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेचे कामकाज पुढील अधिवेशनापर्यंत तहकूब केले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले की, गेल्या १६ दिवसांत लोकसभेत सात विधेयके मंजूर झाली.
राज्यसभेत काय कामकाज झाले त्याची सविस्तर माहिती राज्यसभा सचिवालयाकडून लवकरच सर्वांना दिली जाईल, असे मावळते उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या कारकिर्दीची मुदत येत्या बुधवारी, १० ऑगस्ट रोजी संपत आहे. चालू अधिवेशनात काय कामकाज झाले याचा तपशील संसदेच्या सभागृहांचे कामकाज पुढील अधिवेशनापर्यंत तहकूब करताना सर्व सदस्यांना सादर केला जातो. मात्र, यावेळी राज्यसभेच्या कामकाजाबाबतचा तपशील सादर करण्यात आला नाही.