नव्या मूर्तीचे नाव ‘बालकराम’; पाहून वाहू लागले आनंदाश्रू..., अरुण दीक्षित यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 08:11 AM2024-01-24T08:11:13+5:302024-01-24T08:12:14+5:30

पुरोहित अरुण दीक्षित म्हणाले प्राणप्रतिष्ठा सोहळा अलाैकिक होता

The name of the new idol is 'Balakram'; Tears of joy started flowing after seeing..., Arun Dixit's information | नव्या मूर्तीचे नाव ‘बालकराम’; पाहून वाहू लागले आनंदाश्रू..., अरुण दीक्षित यांची माहिती

नव्या मूर्तीचे नाव ‘बालकराम’; पाहून वाहू लागले आनंदाश्रू..., अरुण दीक्षित यांची माहिती

अयोध्या : रामजन्मभूमीवरील मंदिरात प्राणप्रतिष्ठा झालेली प्रभू श्रीरामांची मूर्ती आता ‘बालकराम’ म्हणून ओळखली जाणार आहे. पाच वर्षे वयाच्या प्रभू श्रीरामांची ही मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगिराज यांनी बनविली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झालेल्या पुरोहितांपैकी एक असलेले अरुण दीक्षित यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, मी पहिल्यांदा प्रभू श्रीरामांची ही मूर्ती पाहिली आणि विलक्षण आनंद झाला. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यावेळी मनात असलेल्या भावना शब्दांपलीकडच्या आहेत. अरुण दीक्षित यांनी आजवर ५० ते ६० प्राणप्रतिष्ठा सोहळ्यांचे पौरोहित्य केले आहे. मात्र, त्या सर्वांमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा अलौकिक स्वरूपाचा होता, असे त्यांचे मत आहे. मंदिराच्या तीनही

मजल्यांचे बांधकाम या वर्षी पूर्ण होणार
मंदिराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याचे बांधकाम लवकरच सुरू होईल. सध्या पहिल्या मजल्याचे बांधकाम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. त्यात राम दरबाराच्या मूर्ती बसवल्या जाणार आहेत. त्यात हनुमान, माता सीता आणि चार भावंडांच्या मूर्ती असतील. राम दरबाराच्या मूर्तींच्या उभारणीसाठी मूर्तिकार निश्चित केले जाणार आहेत. तीनही मजल्यांचे बांधकाम डिसेंबरमध्ये पूर्ण होईल.

अंगवस्त्रमला शुद्ध सोन्याची जर
प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर बनारसी कापडाची वस्त्रे परिधान करण्यात आली आहेत. त्यात पितांबर आणि लाल अंगवस्त्रम आहे. ‘अंगवस्त्रम’ शुद्ध सोन्याची जर आणि धाग्यांनी बनविलेले असून त्यामध्ये ‘शंख’, ‘पद्म’, ‘चक्र’ आणि ‘मयूर’ ही शुभ वैष्णव चिन्हे आहेत. अंकुर आनंद यांच्या लखनौ येथील हरसहायमल श्यामलाल ज्वेलर्सने हे दागिने तयार केले आहेत, तर दिल्लीस्थित टेक्सटाईल डिझायनर मनीष त्रिपाठी यांनी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची वस्त्रे तयार केली आहेत.

बालकांची नावे ठेवली राम, सीता
राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी, २२ जानेवारी रोजी ओडिशातील केंद्रपारा, जगतसिंगपूर जिल्ह्यात जन्माला आलेल्या बालकांची नावे त्यांच्या पालकांनी राम, सीता अशी ठेवली आहेत.  या दोन जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयात सोमवारी सहा बालकांचा जन्म झाला. त्यात मुलगा, मुलीचा समावेश आहे. बालक जन्माला आल्यानंतर २१व्या दिवशी त्याचे बारसे करायचे, अशी ओडिशात प्रथा आहे; पण तिला बाजूला सारून पालकांनी आपल्या बालकांचे सोमवारी नामकरण केले. देशभरात अनेक ठिकाणी प्राणप्रतिष्ठेला बालकांना जन्म देण्यासाठी नोंदणी झाली होती.

केवळ १ हजार रुपयांत घ्या प्रभू श्रीरामांचे दर्शन
भाजपने आपल्या सर्व खासदार, आमदार, मंत्री आणि संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपापल्या भागातील ज्या लोकांना प्रभू श्रीरामांचे दर्शन घ्यायचे आहे, अशा लोकांना अयोध्येला नेण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश दिले आहेत. यासाठी केवळ १ हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. ही योजना २५ मार्चपर्यंत चालणार आहे. प्रत्येक मतदारसंघ आणि देशभरातील प्रत्येक ब्लॉक स्तरावरील लोकांना अयोध्येला घेऊन जाण्याची तयारी सुरू आहे. या योजनेमुळे २५ मार्चपर्यंत सुमारे एक कोटी रामभक्त आपापल्या स्तरावर रामलल्लाचे दर्शन घेतील असा अंदाज आहे.

इस्रायलमध्ये पूजेचे आयोजन
सोहळ्यानिमित्त इस्रायलमधील भारतीयांनी तेल अवीवमधील बीट दानी सभागृहात एका पूजेचे आयोजन केले होते. यावेळी भजन, कीर्तन करण्यात आले. या पूजेच्या आयोजकांमध्ये बहुसंख्य तेलंगणाचे मूळ रहिवासी आहेत. 

‘लोक माफ करणार नाहीत’
टीका करणारे एलडीएफ व यूडीएफ ही विरोधी आघाडी ढोंगी आहे. अशी टीका भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी केली. भारत बदलला आहे; पण केरळमधील सत्ताधारी व विरोधी पक्ष अद्याप बदललेले नाहीत, हेच सत्य उघड झाले. त्याबद्दल लोक तुम्हाला माफ करणार नाहीत. 

Web Title: The name of the new idol is 'Balakram'; Tears of joy started flowing after seeing..., Arun Dixit's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.