'वंदे भारत' मेट्रोचं नाव बदललं, आता 'नमो भारत रॅपिड रेल' नावानं ओळखली जाणार, रेल्वेचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 11:50 AM2024-09-16T11:50:13+5:302024-09-16T11:51:55+5:30
Namo Bharat Rapid Rail: नमो भारत रॅपिड रेल गुजरातमधील भुज ते अहमदाबादपर्यंत धावणार आहे. ही ट्रेन आठवड्यातून ६ दिवस चालवली जाणार आहे.
Namo Bharat Rapid Rail: नवी दिल्ली : वंदे भारत मेट्रो ट्रेनच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून, पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन देशाच्या सेवेत येण्यास सज्ज झाली आहे. याचा पहिला मान गुजरातला मिळाला आहे. दरम्यान, आता वंदे भारत मेट्रोचे नाव बदलले आहे. आता रेल्वेने वंदे भारत मेट्रोचे नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल केले आहे. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या जनतेला देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे भेट देणार आहेत.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत मेट्रोच्या उद्घाटनापूर्वी नामकरणाचा सोहळा पार पडला. यानंतर वंदे भारत मेट्रो आता नमो भारत रॅपिड रेल म्हणून ओळखली जाईल. भारतात दररोज करोडो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. दरम्यान, गुजरातला आज नमो भारत रॅपिड रेलची भेट मिळत आहे. ही नमो भारत रॅपिड रेल गुजरातमधील भुज ते अहमदाबादपर्यंत धावणार आहे. ही ट्रेन आठवड्यातून ६ दिवस चालवली जाणार आहे.
नमो भारत रॅपिड रेलचे किमान भाडे ३० रुपये आहे. यामध्ये जीएसटीचाही समावेश आहे. यासोबतच ५० किलोमीटरच्या प्रवासाला ६० रुपये इतके शुल्क लागेल. नमो भारत रॅपिड रेलमध्ये मासिक पास वैध असेल. साधारण मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन किंवा पॅसेंजर ट्रेनसाठी जारी केलेले तिकीट चालणार नाही. यासाठी वेगळे एमएसटी तिकीट जारी केले जाईल. साप्ताहिक, मासिक तिकीट उपलब्ध असेल. प्रवाशांना सात दिवस, १५ दिवस, २० दिवसांच्या एकेरी प्रवासाचे शुल्क भरावे लागेल.
पहिल्या नमो भारत रॅपिड रेलची वैशिष्ट्ये काय?
नमो भारत रॅपिड रेल ही वंदे भारत ट्रेनसारखीच असेल. परंतु उपनगरीय मेट्रो प्रणालीची वैशिष्ट्ये आणि सोयी सुविधा या ट्रेनमध्ये देण्यात आल्या आहेत. या नमो भारत रॅपिड रेलमध्ये दोन्ही बाजूला इंजिन तसेच स्वयंचलित दरवाजे असतील. पहिली नमो भारत रॅपिड रेल १० डब्यांची असणार आहे. वंदे भारत आणि नमो भारत रॅपिड रेलमधील मुख्य फरक हा आहे की, ही ट्रेन पूर्णपणे अनारक्षित असेल. प्रवासी ही ट्रेन सुटण्याच्या वेळेपूर्वी काउंटरवर तिकीट खरेदी करू शकतात. नमो भारत रॅपिड रेलचे रेक रेल्वे मंत्रालयाच्या चेन्नई येथील आयसीएफमध्ये बनवले आहेत.