रात्रीचा लख्ख प्रकाश करतो झोपेचं खोबरं, जीवजंतूंवरही झाले परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 09:59 AM2022-09-22T09:59:37+5:302022-09-22T10:01:34+5:30
निद्राचक्र बदलले; जीवजंतूंवरही झाले परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील मुंबईसह इतर महानगरे २४ तास जागी असतात, असे म्हटले जाते. ती शहरे रात्री खूप प्रकाशमान असतात. त्यामुळे फार सुंदरही दिसतात. मात्र तिथे रात्री असलेल्या दिव्यांच्या झगमगाटामुळे पर्यावरण तसेच जीवजंतूंचे नुकसान होत आहे. शिवाय माणसाच्या निद्रेचे चक्रही या दिव्यांच्या प्रकाशामुळे बदलले आहे.
‘आर्टिफिशियल लाइट ॲट नाईट : स्टेट ऑफ दी सायन्स २०२२’ असे शीर्षक असलेल्या अहवालात म्हटले आहे की, प्रकाशामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रमाणात सतत वाढ होत आहे. जगातील ८० टक्के लोकसंख्या प्रकाशामुळे प्रदूषित झालेल्या वातावरणात राहते.
एलईडी दिव्याचे तोेटे अधिक
अमेरिका-युरोपमध्ये प्रकाशामुळे होणारे प्रदूषण ९९ टक्के आहे. ब्रिटन, इटली, आयर्लंडमध्ये प्रकाशामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. सायन्स ॲडव्हान्सेज जर्नलच्या सप्टेंबरमधील अंकात एका लेखात म्हटले आहे की, एलईडी दिवा ऊर्जा वाचवितो हे खरे असले तरी सोडिअम लाईटच्या तुलनेत त्याचा प्रकाश प्रखर असतो. त्याचेही अनेक तोटे आहेत.
प्रखर प्रकाशामुळे दृष्टीवर होतो परिणाम
n मुंबई, पुुणे, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आदी मोठ्या शहरांतील उड्डाणपुलांवर, रस्त्यांवर रात्रभर एलईडी लाईट लावण्यात येतात.
n या एलईडीच्या प्रकाशामुळे माणूस व अन्य प्राण्यांचे निद्राचक्र भंग पावले आहे. त्यामुळे दृष्टीवर परिणाम होतो.
n तसेच हृदरोग, मधुमेह, स्थुलत्व आदी विकार होण्याची शक्यता असते. प्रकाशाचे प्रदूषण शरीरातील प्रथिने व अन्य उपकारक गोष्टींचे प्रमाण कमी करते.
४०% कमी झाला फुलांचा सुगंध
नैसर्गिक प्रकाशामुळे झाडे उत्तम प्रकारे वाढतात. पण, कृत्रिम प्रकाशात झाडांची नीट वाढ होत नाही. काही देशांत रातराणीच्या झाडाला फुले येण्याचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे. काही फळांच्या चवीत फरक पडला आहे. गुलाब, रातराणी आदी फुलांचा सुगंध कृत्रिम प्रकाशामुळे ४० टक्के कमी झाला आहे. सोडियम व एलईडी लाईटमुळे पाळीव जनावरेही आक्रमक बनली आहेत, असे काही पाहण्यात आढळून आले.