Narendra Modi: अहिंसा यात्रेने देशाला एका विचाराने जोडले, PM मोदींचे गौरवोद्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 06:43 AM2022-03-28T06:43:19+5:302022-03-28T06:43:45+5:30
पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्गार : सप्तवर्षीय यात्रेचा समारोप, २० राज्यात केला अहिंसेचा प्रचार
नवी दिल्ली : भारताला हजारो वर्षांपासून संत, ऋषी, मुनी व आचार्य यांची महान परंपरा आहे. आचार्यश्री महाश्रमणजी यांनी सात वर्षांत १८००० किमीची पदयात्रा पूर्ण केली आहे. ही पदयात्रा जगातील तीन देशांची होती. या माध्यमातून आचार्यश्री यांनी वसुधैव कुटुम्बकम या भारतीय विचाराचा विस्तार केला आहे, देशाला एका विचाराने जोडले आहे, असे मत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
शांतिदूत युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या सप्तवर्षीय अहिंसा यात्रेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. ९ नोव्हेंबर २०१४ रोजी लालकिल्ला येथून प्रारंभ झालेल्या या अहिंसा यात्रेचा रविवारी (दि.२७) तालकटोरा स्टेडियम येथे समारोप झाला. यावेळी ऑनलाइन संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, श्वेतांबर तेरापंथच्या आचार्यांचे मला नेहमीच प्रेम मिळत आलेले आहे. आचार्य तुलसीजी, त्यांचे पट्टधर आचार्य महाप्रज्ञजी आणि आता आचार्यश्री महाश्रमणजी यांचे आशीर्वाद मिळत आलेले आहेत. त्यामुळेच मला असे वाटते की, यह तेरापंथ है, यह मेरा पंथ है.
रविवारी सकाळी ८.५० वाजता या समारोप समारंभासाठी आचार्यश्री यांनी मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेतून प्रस्थान केले. ते जसजसे तालकटोरा स्टेडियमकडे जात होते तशी भाविकांची गर्दी वाढत होती. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल हेही यात्रेत सहभागी झाले.
यावेळी व्यासपीठावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल, नेपाळचे माजी उपराष्ट्रपती परमानंद झा, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग म्हणाले की, आचार्यश्री महाश्रमणजी यांच्या दर्शनाचा दुसऱ्यांदा लाभ मिळाला हे माझे भाग्य आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही या कार्यक्रमात ऑनलाइन उपस्थित होते. ते म्हणाले की, देशहितासाठी एका धर्माचार्यांकडून हजारो किमीची यात्रा हे एकमेव उदाहरण आहे. यावेळी खासदार एस. एस. अहलुवालिया, माजी केंद्रीय मंत्री सत्यनारायण जटिया व भारतातील नेपाळचे राजदूत रामप्रसाद सुबेदी यांनी विचार मांडले. यावेळी देशविदेशांतील दिग्गज या कार्यक्रमास ऑनलाइन उपस्थित होते. यात प्रामुख्याने नेपाळचे माजी राष्ट्रपती रामबरण यादव, सरसंघचालक मोहन भागवत, आसाम व नागालँडचे राज्यपाल जगदीश मुखी, झारखंडचे राज्यपाल रमेश बैस, ओडिशाचे राज्यपाल गणेशीलाल, तेलंगणाचे व पद्दुचेरीचे राज्यपाल डॉ. तमिलिसाई सौंदरराजन, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी आपले विचार मांडले.
सद्भावना, नैतिकता आणि नशामुक्ती या उद्देशाने जैन श्वेतांबर तेरापंथ धर्मसंघाचे अकरावे आचार्यश्री महाश्रमण यांनी अहिंसा यात्रेच्या माध्यमातून भारतातील २० राज्यांत आपले उपदेश, प्रवचने यातून अहिंसेचा प्रचार केला.
१८,००० किमी यात्रेत पायी चालून आचार्यश्री यांनी नेपाळ, भूतानमध्येही मंगल संदेशातून लोकांना सन्मार्ग दाखविला.