मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 04:21 PM2024-09-30T16:21:37+5:302024-09-30T16:22:37+5:30
देशातील जनता जागी झाली आहे. त्याचे उत्तर लोकसभेला दिले आहे. भाजपा प्रत्येक स्तरावर अपयशी ठरली आहे असं त्यांनी म्हटलं.
लखनौ - उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील समाजवादी पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री महबूब अली यांनी वादग्रस्त विधान केले आहे. उत्तर प्रदेशात मुस्लिमांची संख्या वाढल्याचं सांगत त्यांनी भाजपा सरकारला इशारा दिला आहे. आता मुस्लीम संख्या वाढलीय, तुमची सत्ता संपणार असं विधान महबूब अली यांनी केले आहे. बिजनौर इथं एका जनसभेला ते संबोधित करत होते.
सपा आमदार महबूब अली इतक्यावरच थांबले नाहीत तर पुढे ते म्हणाले की, मुघलांनी देशावर ८०० वर्ष राज्य केले हे ये लोक करतील का? २०२७ मध्ये तुम्ही जाणार आणि आम्ही नक्की येणार. भाजपा सरकार आरक्षण विरोधी आहे. केंद्रातील सरकार सर्वकाही विकणारे आहे. रेल्वे विकली, दूरसंचार विकला, एलआयसी विकली, विमानतळे विकले आता देशही विकायला काढतील. इंशाल्लह, २०२७ मध्ये आम्ही यायची वेळ आहे. भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच देशातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक समाजाला शांतता हवी परंतु काही लोकांना ते नकोय. येणाऱ्या काळात तुमची सत्ता संपणार आहे कारण मुस्लिमांची संख्या वाढलीय. देशातील जनता जागी झाली आहे. त्याचे उत्तर लोकसभेला दिले आहे. भाजपा प्रत्येक स्तरावर अपयशी ठरली आहे त्यामुळे केवळ दंगली घडवून त्यांना सत्तेत राहायचं आहे. सर्वांना भाजपाला हटवायचं आहे असंही समाजवादी पक्षाचे आमदार महबूब अली यांनी म्हटलं.
मेहबूब अली २००२ मध्ये खंथ मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. मेहबूब अली यांनी २००७ ची यूपी विधानसभा निवडणूक समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लढवली होती. त्यांनी आपली जागा कायम राखत भाजपाचे त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी उमेदवार मंगल सिंग यांचा पराभव केला. २०१२ आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. अखिलेश यादव सरकारमध्ये नोव्हेंबर २०१५ मध्ये मंत्रिमंडळ फेरबदल करताना त्यांना रेशीम आणि वस्त्रोद्योग मंत्री करण्यात आले होते. ऑक्टोबर २०१६ मध्ये त्यांना लघु पाटबंधारे खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.
भाजपाचा पलटवार
भाजपा नेते अमित मालवीय यांनी महबूब अली यांच्या विधानावर पलटवार केला आहे. संविधान सभेत सपा आमदारानं अशाप्रकारे चिथावणी देणारं विधान केले आहे. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही असं त्यांनी म्हटलं.