Gyanvapi Case: ‘ज्ञानवापी परिसरातील ती वस्तू शिवलिंग नाही तर कारंजे, पण…’ काशीच्या महंतांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 07:38 PM2022-05-23T19:38:32+5:302022-05-23T19:39:27+5:30
Gyanvapi Case: सध्या वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेला वाद देशभरात चर्चिला जात आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या मागे असलेल्या काशी करवत मंदिराचे महंत पंडित गणेश शंकर उपाध्याय यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.
वाराणसी - सध्या वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेला वाद देशभरात चर्चिला जात आहे. दरम्यान, मशिदीमध्ये झालेल्या सर्व्हेनंतर एका पक्षाने मंदिर परिसरात शिवलिंग असल्याचा दावा केला आहे. तर दुसऱ्या पक्षाने ते पाण्याचे कारंजे असल्याचे म्हटले आहे. आता याबाबत केलेल्या सर्व्हेचा रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात आला असून, सर्वजण कोर्टाच्या नितालाची वाट पाहत आहे. दरम्यान, काशी विश्वनाथ मंदिराच्या मागे असलेल्या काशी करवत मंदिराचे महंत पंडित गणेश शंकर उपाध्याय यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.
पंडित गणेश शंकर उपाध्याय यांनी सांगितले की, ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग नाही आहे, तर ते पाण्याचे कारंजे आहे. गेल्या ५० वर्षांपासून आम्ही ते पाहत आहोत. मात्र हे कारंजे सुरू असल्याचे आम्ही कधी पाहिले नाही. एका पक्षाचे लोक ते शिवलिंग असल्याचे सांगत आहेत. पाहण्यामध्ये ती वस्तू शिवलिंगासारखी दिसते. पण आमच्या माहितीनुसार ते कारंजे आहे. आम्ही लहानपणापासून ते पाहतोय.
आम्ही शेकडो वेळा त्या आकृतीजवळ गेलोय. अनेक तास राहिलोय. ज्ञानवापी परिसरातील मौलवी आणि सेवादारांशीही आमचं बोलणं व्हायचं. तेथील बांधकाम आधीपासून आहे. आम्ही त्यांना विचारायचो की मध्ये काय आहे, तर ते सांगायचे की ते कारंजे आहे. तसेच ते मुघलकालीन कारंजे आहे. मात्र आम्ही ते चालू असलेले कधी पाहिले नाही, असेही त्यांनी नमूद केले.
मीडियामध्ये जो व्हिडिओ आलाय त्यात काही सफाई कर्मचारी साफसफाई करताना दिसत आहेत. त्यात वरून फोटो घेण्यात आल्याने ती वस्तू शिवलिंगासारखी दिसत आहे. दरम्यान, तेथील नंदी मशिदीकडे का बघत आहे असं विचारलं असता गणेश शंकर उपाध्याय यांनी सांगितसे की, तिथे मंदिर होते, ही बाब कटू सत्य आहे. मुघलांनी ते मंदिर तोडले आणि तिथे मशीद बांधली. मात्र मागच्या बाजूला मंदिराचा काही भाग उरलेला आहे.