महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी; धनुष्यबाणाबाबतही होणार निर्णय, राज्याचं लागलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 06:02 AM2023-01-10T06:02:14+5:302023-01-10T06:02:32+5:30
दोन्ही गटांनी शिवसेनेवर दाव्यासाठी २० लाखांवर कागदपत्रे सादर केलेली आहेत.
नवी दिल्ली : गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा व सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी मंगळवारी होणार आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगातही शिवसेना व निवडणूक चिन्हांच्या दाव्यावर प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह वेगळा गट स्थापन केल्यापासून शिवसेना राजकीय पक्ष व धनुष्यबाण हे चिन्हा कोणत्या गटाचे आहे, यावर अद्यापही कोणताही निर्णय झाला नाही. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षाचे नाव धनुष्यबाण चिन्ह गोठवून दोन्ही गटांना वेगवेगळे पक्षाची नावे व निवडणूक चिन्हांचे वाटप केले होते. ही केवळ अंतरिम सोय होती, यामुळे आयोगाच्या या सुनावणीकडे सुद्धा लक्ष लागलेले आहे. दोन्ही गटांनी शिवसेनेवर दाव्यासाठी २० लाखांवर कागदपत्रे सादर केलेली आहेत.