सर्वांनाच मोफत प्रवास देणारी देशातील एकमेव रेल्वे, जाणून घ्या विशेष कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 02:19 PM2023-06-05T14:19:06+5:302023-06-05T14:20:35+5:30
या रेल्वेतून प्रवाशांना मोफत प्रवास कसा दिला जातोय, असा प्रश्न सर्वांनाच साहजिकरित्या पडणे आवश्यक आहे.
हिमाचल प्रदेश - भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठी रेल्वेसेवा आहे. देशभरात जाळं विणलेल्या या रेल्वेतून आपण तुलनेनं कमी खर्चात प्रवास करू शकतो. मात्र, रेल्वेची एक ट्रेन अशीही आहे जी प्रवाशांना मोफत सेवा देते. विशेष म्हणजे २५ गावांतील लोकांना गेल्या ७३ वर्षांपासून ही रेल्वे मोफत सेवा देत आहे. कारण, कायदेशीररित्याही या रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणे हा गुन्हा नाही. म्हणूनच, सर्वच प्रवाशी या रेल्वेतून मोफत प्रवासाचा आनंद घेतात.
हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमारेषेवर ही रेल्वे धावते. ज्यामध्ये, प्रवास करण्यासाठी एकही रुपया लागत नाही. जर तुम्ही भाखडा-नागल धरण पाहायला जाल, तर या रेल्वेतून तुम्हाला मोफत प्रवासाचा आनंद घेता येईल. नागल ते भाखडा बांध मार्गावरुन ही ट्रेन धावते. एकीकडे रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या तिकीट दरात वाढ करण्यात येत आहे. मात्र, या रेल्वेतून प्रवाशांना मोफत प्रवास कसा दिला जातोय, असा प्रश्न सर्वांनाच साहजिकरित्या पडणे आवश्यक आहे.
भाखडा डॅमची माहिती देण्याच्या उद्देशानेच ही रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठा भाखडा डॅम कसा बनला, त्याचा इतिहास काय, कुठल्या परिस्थितीशी सामना करत हे धरण उभारले हे नव्या पिढीला कळावे, यासाठी ही ट्रेन प्रवासी आणि पर्यटकांना भाखडा धरणावर मोफत घेऊन जाते. भाखडा ब्यास मॅनेजमेंट बोर्डद्वारे (BBMB) ही ट्रेन सुरू आहे. हा रेल्वेमार्ग बनवताना, मोठ्या डोंगरांना पोखरुन रेल्वेमार्ग बनवण्यात आला. ज्याद्वारे धरणासाठी लागणारी साधनसामुग्री पोहोचवण्यात येत होती.
भाखडा ते नागला या रेल्वेला सर्वप्रथम १९४७ साली सुरू करण्यात आलं. या ट्रेनद्वारे २५ गावांतून दररोज ३०० प्रवासी प्रवास करतात. या ट्रेनचा सर्वाधिक फायदा विद्यार्थ्यांनाच होतो. ही ट्रेन नंगल येथून धरणापर्यंत धावते. दिवसातून दोन फेऱ्याही होतात. या ट्रेनचं विशेष म्हणजे या गाडीचे संपूर्ण रेल्वे कोच लाकडापासून बनविण्यात आलेले आहेत.