विरोधी बाकांवरच बसण्याचे विरोधकांनी निश्चित केलेय; पंतप्रधान मोदींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 06:01 AM2023-12-20T06:01:43+5:302023-12-20T06:02:07+5:30
भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याच्या घटनेचे समर्थन करण्याचे घडलेले प्रकारही चिंता वाटण्याजोगे आहेत.
- संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भाजपचे केंद्रातील सरकार सत्तेवरून घालविणे इतकेच विरोधी पक्षांचे उद्दिष्ट आहे. मात्र, देशाचे भविष्य उज्ज्वल करणे हे केंद्र सरकारचे ध्येय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. विरोधी पक्ष ज्या पद्धतीने वागत आहेत, त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची संख्या आणखी कमी होणार असून, भाजपचे संख्याबळ वाढणार आहे. पुन्हा विरोधी बाकांवरच बसण्याचे विरोधकांनी निश्चित केले असल्याचेही नरेंद्र मोदी म्हणाले.
भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याच्या घटनेचे समर्थन करण्याचे घडलेले प्रकारही चिंता वाटण्याजोगे आहेत.
१३ डिसेंबरला दोन जणांनी संसदेत घुसखोरी केली होती. देशातील बेकारी, महागाईमुळे संसदेत घुसखोरी करण्याचा प्रकार घडला, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. मोदी यांनी सांगितले की, लोकशाही आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाने संसदेतील घुसखोरीचा निषेध करायला हवा. निवडणुकीतील पराभवामुळे विरोधी पक्ष निराश झाले आहेत. त्यामुळे ते आता संसदेच्या कामात व्यत्यय आणत आहेत, असे मोदी म्हणाले.
विकसित भारत संकल्प यात्रेतून खूप शिकता आले
nपंतप्रधान म्हणाले की, भाजपच्या खासदारांनी संसदेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.
n२६ जानेवारीपर्यंत सुरू राहाणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये अनेक चांगले अनुभव येत असून, त्यातून खूप काही शिकता येण्यासारखे आहे.
‘त्या’ खासदारांचे २७ प्रश्न यादीतून हटविले
लोकसभेतील निलंबित विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विचारलेले २७ प्रश्न मंगळवारी प्रश्नांच्या यादीतून काढून टाकण्यात आले. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मंत्र्यांना समान प्रश्न विचारणाऱ्या सदस्यांच्या गटातून अनेक निलंबित खासदारांची नावे काढून टाकण्यात आली असल्यााचे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.