पोपट ओरडला अन् उलगडला मालकिणीचा खून; ९ वर्षांनी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 09:47 AM2023-03-26T09:47:08+5:302023-03-26T09:47:16+5:30
पाेपटाच्या ओराडण्यावरून शर्मा यांनी पोलिसांना भाच्याची चौकशी करण्याची विनंती केली.
आग्रा : आग्र्यातील अग्रगण्य वृत्तपत्राचे मुख्य संपादक विजय शर्मा यांच्या पत्नी नीलम शर्मा यांची २० फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांच्याच घरात दरोड्यानंतर हत्या झाली होती. मात्र, घरातला पाळीव पोपट, शर्मा यांच्याच भाच्याचे नाव घेऊन ओरडेपर्यंत पोलिसांकडे कोणताच सुगावा नव्हता. पोपटच्या सतत ओरडण्यामुळे विजय शर्मा यांना संशय आला आणि त्यातून खुनाचा उलगडा झाला. न्यायालयाने ९ वर्षांनंतर आराेपींना जन्मठेप सुनावली.
पाेपटाच्या ओराडण्यावरून शर्मा यांनी पोलिसांना भाच्याची चौकशी करण्याची विनंती केली. त्यानंतर आशूने त्याचा मित्र रॉनीच्या मदतीने नीलमची हत्या केल्याची कबुली दिली. शुक्रवारी हत्येच्या ९ वर्षांनी विशेष न्यायाधीश मोहम्मद रशीद यांनी आशू आणि रॉनी या दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. माहितीनुसार, विजय शर्मा, मुलगा राजेश आणि मुलगी निवेदिता यांच्यासोबत फिरोजाबाद येथे एका लग्नासाठी गेले होते. नीलम घरीच होत्या. रात्री घरी परतल्यावर पत्नी आणि पाळीव कुत्रा निपचीत पडल्याचे बघून त्यांना धक्का बसला. दोघांची चाकूने वार करून हत्या झाली होती.
घटनेच्या ६ महिन्यांनी पोपटाचा मृत्यू झाला. तर, कोरोना महामारीदरम्यान १४ नोव्हेंबर २०२० रोजी विजय शर्मा यांचे निधन झाले. आशू नेहमी घरी यायचा, घरातील दागिने-रोख रकमेबाबत त्याला माहिती होती, त्यानेच दरोड्याची योजना आखली, असे शर्मांची मुलगी निवेदिता म्हणाली. “माझ्या पालकांची इच्छा होती की, आशूला फाशी व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका करू” असे ती म्हणाली.
पोपट ओरडायला लागला “आशू-आशू”
पोलिसांना माहिती दिल्यानंतर काही संशयितांना पकडण्यात आले. दुसरीकडे, शर्मा यांच्या पोपटाने खाणेपिणे बंद केले आणि तो अगदी गप्प झाला. हा खून पोपटानेच पाहिला असावा, असा संशय शर्मा यांना आला. त्यांनी पोपटासमोर संशयितांची नावे घेण्यास सुरुवात केली, तेव्हा आशूचे नाव घेताच पोपट घाबरला आणि “आशू-आशू” ओरडू लागला. पोलिसांसमोरही आशूच्या नावावर पोपटाची अशीच प्रतिक्रिया आल्यावर त्याला अटक करण्यात आली. पोपट पोलिसांच्या तपासाचा भाग होता. तथापि, तो पुराव्याचा भाग नव्हता. संपूर्ण खटल्यात पोपटाचा उल्लेख करण्यात आला होता; परंतु कायद्यात तरतूद नसल्याने पुरावा म्हणून त्याला सादर करण्यात आले नाही.