रुग्ण ओटीमध्ये होता, डॉक्टर कोंडीत अडकला, कार तशीच सोडून तीन किमी धावला...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 10:34 AM2022-09-12T10:34:45+5:302022-09-12T10:35:14+5:30
कार काही केल्या पुढे जात नव्हती. रुग्ण ओटीमध्ये होता, त्याला भूल देण्यात आली होती. पित्ताशयाच्या पिशवीची सर्जरी करायची होती.
बंगळुरू : डॉक्टर हा देवदूत असतो म्हणतात. परंतू, आज असे अनेक प्रकार घडतात ज्यामुळे डॉक्टरांबाबत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये डॉक्टरची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे. पण, बंगळुरूमधील डॉक्टरने जे केले ते समजल्यावर तुम्ही त्या डॉक्टरचे आभार मानाल व देवासारखा धावून गेलाही म्हणाल.
डॉक्टर गोविंद नंदकुमार असे या डॉक्टरांचे नाव आहे. मणिपाल हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएंटरोलॉजी सर्जन डॉ. नंदकुमार हे ऑपरेशनसाठी जात होते. परंतू त्यांची कार सरजापुर-मराठाहळ्ळीच्या वाहतूक कोंडीत अडकली. कार काही केल्या पुढे जात नव्हती. रुग्ण ओटीमध्ये होता, त्याला भूल देण्यात आली होती. पित्ताशयाच्या पिशवीची सर्जरी करायची होती. अन्य रुग्ण देखील सर्जरीसाठी वाट पाहत होते, नंदकुमार यांची गाडी जिथे अडकली होती, तिथून मणिपाल हॉस्पिटल तीन किमीवर होते. यामुळे मागचापुढचा विचार न करता डॉक्टर गाडीतून उतरले, कार तिथेच सोडली आणि हॉस्पिटलकडे धाव घेतली. ही घटना ३० ऑगस्टची आहे.
नंदकुमार यांनी टाईम्स ऑफ इंडियाला माहिती देताना सांगितले की, “मला कनिंगहॅम रोडवरून सर्जापूरच्या मणिपाल हॉस्पिटलला पोहोचायचे होते. मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे हॉस्पिटलच्या आधी काही किलोमीटर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत होत नसल्याचे दिसल्याने मी माझ्या कारमधून बाहेर पडलो 45 मिनिटे धावलो. जे रुग्ण शस्त्रक्रियेसाठी थांबले होते, ते सकाळपासून उपाशी होते. त्यांना शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काही खाता येणार नव्हते. यामुळे मी त्यांना जास्त वेळ थांबवू शकत नव्हतो.''
डॉ. गोविंद नंदकुमार हे गेल्या १८ वर्षांपासून सेवा देतात. त्य़ांनी आतापर्यंत हजाराहून अधिक ऑपरेशन केली आहेत. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमधून ट्यूमर आणि खराब झालेले भाग काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांचे ते तज्ञ आहेत.