रुग्णवाहिकेत नव्हता रुग्ण, मग होतं काय? पाहून पोलीस अवाक्, ११०० किमी लांब होणार होती सप्लाय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 03:39 PM2024-02-19T15:39:25+5:302024-02-19T15:39:40+5:30
Crime News: हरियाणामधील सोनिपत जिल्हा हा नेहमी मद्य तस्करीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासुन सोनिपत पोलिसांकडून मद्य तस्करांवर पाश आवळला जात आहे.
हरियाणामधील सोनिपत जिल्हा हा नेहमी मद्य तस्करीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासुन सोनिपत पोलिसांकडून मद्य तस्करांवर पाश आवळला जात आहे. सोनिपत राई ठाणे पोलिसांनी मद्य तस्करी करणाऱ्या अशा एका टोळीचा पर्दाफाश केला आहे जे रुग्णवाहिकेत मद्याच्या बाटल्या भरून सोनिपत येथून बिहारमध्ये मद्य तस्करी करत असे. या तस्करांनी रुग्णवाहिकेमध्ये मद्य ठेवण्यासाठी एक गुप्त जागा तयार करून ठेवली होती.
मिळालेल्या माहितीनुसार या अॅम्ब्युलन्समधून आरोपी रघुनाथ आणि रमेश हे मद्य घेऊन जात होते. दोघेही बिहारमधील रहिवासी आहेत. तसेच त्यांचे दोन सहकारी राहुल आणि विक्की हे सोनिपत येथील आहेत. सर्व आरोपी अगदी सराईतपणे अँम्युलन्समधून बिहारमध्ये मद्याची तस्करी करायचे. हे आरोपी महागडी दारू बिहारमध्ये घेऊन जायचे. त्यांच्याकडून सोनिपत राई ठाणे पोलिसांनी रुग्णवाहिकेमध्ये ९६ महागड्या मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या बाटल्या केबिनमध्ये लपवण्यात आल्या होत्या. आरोपींना अटक करून कोर्टात हजर केलं असता न्यायमूर्तींनी तीन आरोपींची तुरुंगात रवानगी केली. तर एका आरोपीला कोठडी देण्यात आली आहे.
राई पोलीस ठाण्याचे प्रभारी लाल सिंह यांनी सांगितले की, रुग्णवाहिकेमध्ये मद्य भरून ती बिहारला पाठवली जात असे. पोलिसांनी कुंडली मानेसर पलवल एक्स्प्रेस वे येथे एक नाका लागलेला होता. जेव्हा पोलिसांनी रुग्णवाहिकेला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी रुग्णवाहिका पळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिकेचा पाठलाग करून आरोपींना पकडले. या रुग्णवाहिकेमध्ये मद्याच्या ९६ महागड्या बाटल्या होत्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन बिहारचे तर त्यांच्यातील एक आरोपी हा सोनिपत येथील आहे.