बृजभूषण सिंह लढवय्या माणूस, मागे हटणार नाही; शिवसेनेनं केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:50 PM2022-05-19T12:50:07+5:302022-05-19T12:51:11+5:30
त्यांचे महाराष्ट्राशी संबंध फार जुने आहेत. आम्ही त्यांना नेताजी म्हणतो असं संजय राऊतांनी बृजभूषण सिंह यांच्याबाबत म्हटलं.
नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील जनतेच्या भावनांचा उद्रेक एखादा नेता करत असेल तर त्यांच्याशी संवाद साधावा लागेल. राज ठाकरेंनी पूर्वीची भूमिका होती ती का सोडली माहिती नाही. हिंदी भाषिकांविरोधात भूमिका घेतली होती. मराठी अस्मितेबद्दल बोलत होते, मग अचानक एका रात्रीत हिंदुत्व आठवले आणि अयोध्येला निघाले अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, बृजभूषण शरण सिंह हे त्यांची भूमिका मांडत आहेत. बृजभूषण सिंह यांना मी अनेक वर्ष ओळखतो. तो माणूस लढवय्या आहे. त्यांचे महाराष्ट्राशी संबंध फार जुने आहेत. आम्ही त्यांना नेताजी म्हणतो. ते स्वत: पैलवान आहेत. अनेक कुस्तीगीर त्यांनी निर्माण केले. आम्ही एकत्र काम केले आहे तो माणूस मागे हटणार नाही असं वाटतं अशा शब्दात शिवसेनेने त्यांचे कौतुक केले आहे.
त्याचसोबत साध्वी कांचनगिरी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावर बोलताना राऊतांनी म्हटलं की, या देशात साधू कोण आहे? कोणीही उठतो साधू बनतो असं नाही. साधू ही वृत्ती अंगात असावी लागते. जटा वाढवल्याने कुणी साधू बनत नाही. आमचा अयोध्येतील दौरा राजकीय नाही. अयोध्येशी शिवसेनेचं नातं घट्ट आहे. राज ठाकरेंनी अयोध्येत घर घेतले, आश्रम बांधले तरी शिवसेनेला काही फरक पडणार नाही अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली आहे.
२०२४ ची तयारी सुरू
प्रत्येक धार्मिक आणि ऐतिहासिक जागांचं उत्खनन करून धार्मिक तेढ निर्माण करायचे. दंगली पेटवायच्या हे दोन्ही बाजूने टाळायला हवे. अनेक हिंदुत्ववादी संघटना आहे. प्रत्येक पाऊल संयमाने काळजीपूर्वक घ्यावं. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढायला हवी परंतु भाजपाकडून २०२४ ची तयारी सुरू आहे. महागाईवर कोणी बोलत नाही. बेरोजगारीवर कोणी बोलत नाही. फक्त मशीद, मंदिर यावर निवडणुका लढवल्या जात आहेत. कैलास मानसरोवर चीनच्या ताब्यात आहे ते भारताने मिळवावं असं आव्हान संजय राऊतांनी केलं आहे.
कांचनगिरींनी पत्रात काय म्हटलं?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या(MNS Raj Thackeray) अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांना रोखावं अन्यथा संत, नागासाधू यांचा सामना करावा लागेल असं थेट पत्र कांचनगिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं आहे. राजकीय लढाई करायची असेल तर जरूर करा, पण देवदर्शनासाठी जर कुणाला अडवत असाल तर याद राखा. सर्व साधू संतांचा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा आहे असं गुरु माँ कांचनगिरी यांनी सांगितले.