'फोन येण्यास सुरुवातही झाली, सर्व रेकॉर्डिंग करा'; अरविंद केजरीवालांचा नगरसेवकांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 04:57 PM2022-12-10T16:57:46+5:302022-12-10T17:00:02+5:30
तुम्ही आम्हाला कळवल्यास त्यांच्यावर लगेच कारवाई करु, असं आश्वासनही अरविंद केजरीवाल यांनी आपच्या नगरसेवकांना दिलं.
नवी दिल्ली- गेल्या आठ वर्षापासून दिल्लीच्या मतदारांवर असलेल्या आम आदमी पार्टीच्या (आप) प्रभावाचा अनुभव पुन्हा एकदा दिल्ली महापालिका निवडणुकीत आला. १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपच्या 'हाय प्रोफाइल' प्रचारमोहिमेला नामोहरम करीत आपने पूर्ण बहुमताने दिल्ली महापालिकाही काबीज केली आहे. दिल्ली महापालिकेच्या २५० सदस्यांच्या सभागृहात आपचे १३४, भाजपाचे १०४ उमेदवार विजयी झाले. तर काँग्रेस केवळ ९ या आकड्यावर स्थिरावली.
दिल्ली महापालिकेचा निकाल लागून तीन दिवस उलटले असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदे केजरीवाल यांनी विजय झालेल्या नगरसेवकांना महत्वाचा सल्ला दिला आहे. तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न केला जाईल. काही जणांना फोन येण्यास सुरुवात देखील झाली आहे. मात्र मला तुमच्यावर विश्वास असल्याचं अरविंदे केजरीवाल यांनी विजयी झालेल्या आपच्या नगरसेवकांना सांगितलं.
भाजपाचा पर्दाफाश करणेही गरजेचे आहे. म्हणूनच जर कोणी तुम्हाला कॉल केला तर रेकॉर्डिंग चालू करा, कोणताही कॉल येईल तो रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करा, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हणाले. तसेच तुम्हाला येऊन कोणी भेटले तर ऑडिओ रेकॉर्डिंग चालू करा, म्हणजे त्यांचे बोलणे रेकॉर्ड होईल आणि आपल्याला त्यांचा पर्दाफाश करता येईल. तसेच याबाबत तुम्ही आम्हाला कळवल्यास त्यांच्यावर लगेच कारवाई करु, असं आश्वासनही अरविंद केजरीवाल यांनी आपच्या नगरसेवकांना दिलं.
दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक आपल्यासाठी खूप कठीण होती. आपल्या विरोधात अनेक कारस्थान रचली गेली. संपूर्ण यंत्रणा वापरली गेली. भाजपाचे ७ मुख्यमंत्री, १७ केंद्रीय मंत्री, देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा हे सर्व निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. प्रसारमाध्यमांवर दबाव आणत आपल्याविरोधात अपप्रचार केला जात होता, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी नगरसेवकांना संबोधित करताना केला.
दिल्ली नगर निगम में आम आदमी पार्टी के सभी नवनिर्वाचित पार्षदों के साथ बातचीत। https://t.co/SCklCTdy6w
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 10, 2022
दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला. मात्र, असे असले तरी अरविंद केजरीवाल आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष बनणार असल्याने खुश दिसत आहेत. यासाठी त्यांनी गुजरातच्या जनतेचे आभारही मानले आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी तीन अटी आहेत. या अटींची पूर्तता केल्यानंतर त्या पक्षाला अनेक सुविधा दिल्या जातात. यात दिल्लीत केंद्रीय कार्यालयासाठी मोफत सरकारी जमीन अथवा सरकारी बंगला यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय पक्ष होण्याचे फायदे -
- जेव्हा एखादा पक्ष राष्ट्रीय पक्ष होतो, तेव्हा त्याला दिल्लीमध्ये केंद्रीय कार्यालय बनविण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून एखादा बंगला अथवा जमीन मोफत दिली जाते. यानंतर भाजप आणि काँग्रेसप्रमाणेच आम आदमी पक्षाचेही दिल्लीत केंद्रीय कार्यालय असेल. सध्या दिल्लीतील कार्यालयासाठी 'आप'ने स्वतःच्याच सरकारकडून जमीन भाड्याने घेतली आहे.
- आम आदमी पक्षाचे निवडणूक चिन्ह 'झाडू', हे त्यांच्याकरता नेहमीसाठी राखीव होईल.
- निवडणूक प्रचारासाठी पक्ष आपले 40 स्टार प्रचारक मैदानात उतरवू शकतो, ज्यांचा खर्च उमेदवारांच्या खर्चाव्यतिरिक्त असेल.
- दूरदर्शनवर प्रचारासाठी आम आदमी पक्षाला एक निरश्चित कालावधी मिळेल.