दिल्लीत हक्कभंग समितीसमोर हजर होणार राज्यातील 3 IPS अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 07:30 IST2022-04-02T07:28:30+5:302022-04-02T07:30:13+5:30
नवनीत राणांच्या नोटीसवर समितीचे निर्देश

दिल्लीत हक्कभंग समितीसमोर हजर होणार राज्यातील 3 IPS अधिकारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दाखल केलेल्या हक्कभंगाच्या नोटीसची दखल घेऊन लोकसभेच्या हक्कभंग समितीने राज्यातील तीन आयपीएस अधिकाऱ्यांना येत्या ६ एप्रिलला तोंडी साक्षी पुराव्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून झालेल्या वादानंतर खासदार नवनीत राणा यांना संसदीय कर्तव्ये पार पाडण्यात पोलीस अधिकाऱ्यांनी अडथळे आणल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. लोकसभेच्या हक्कभंग समितीचे अध्यक्ष सुनील कुमार सिंग यांच्या १५ सदस्यीय समितीने राज्यातील तीन आयपीएस अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. यात मुंबईचे पोलीस आयुक्त, अमरावतीचे पोलीस आयुक्त व अमरावतीच्या पोलीस उपायुक्तांचा समावेश आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांना येत्या ६ एप्रिलला संसदेतील हक्कभंग समितीच्या कक्षात तोंडी साक्षी पुराव्यासाठी हजर राहावे लागणार आहे.