...तर भोलेबाबांचीही चौकशी, २ महिलांसह ६ सेवेकरी अटकेत; 'त्या'साठी १ लाखाचं बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 06:50 AM2024-07-05T06:50:37+5:302024-07-05T06:51:10+5:30
फरार आरोपी देवप्रकाश मधुकर याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर
मैनपुरी : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगाच्या कार्यक्रमस्थळी सेवेकरी म्हणून काम करणाऱ्या दोन महिलांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक व सध्या फरार असलेला मुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्याला पकडून देणाऱ्यास पोलिसांनी १ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. आवश्यकता वाटल्यास भोलेबाबाचीही पोलिस चौकशी करणार आहेत.
राम लडाईत (वय ५० वर्षे), उपेंद्र यादव (६२), मेघ सिंग (६१), मुकेश कुमार (३८) तसेच महिलांपैकी मंजू यादव (३०) आणि मंजू देवी (४०) अशी अटक केलेल्या सहा आरोपींची नावे आहेत. हाथरस येथे २ जुलै रोजी सत्संगाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला होता. सत्संगाला ८० हजार लोकांनी उपस्थित राहण्याची परवानगी प्रशासनाने दिली होती; पण प्रत्यक्षात अडीच लाख लोक हजर राहिले, असे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.
भोलेबाबाचा मुख्य सेवेकरी झाला फरार
मुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर हाथरसच्या सिकंदराराऊ येथील रहिवासी असून तो भोलेबाबा यांचा निकटवर्तीय आहे. त्याचे घर सध्या बंद असून तो परिवारासहित फरार झाला असल्याचे सांगण्यात आले. मैनपुरी येथील भोलेबाबांच्या आश्रमामध्ये पोलिसांनी बुधवारी रात्री प्रवेश केला होता.
दुर्घटनेमागे मोठा कट असण्याची शक्यता
उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेमागे मोठा कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हटले होते.
चौकशी समिती आपला अहवाल दोन महिन्यांत सरकारला सादर करणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
सर्व मृतदेहांची ओळख पटली
हाथरस येथील चेंगराचेंगरीमध्ये जीव गमावलेल्या सर्व १२१ लोकांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे, असे तेथील जिल्हाधिकारी आशिषकुमार यांनी गुरुवारी सांगितले. हे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
राहुल गांधी आज हाथरसला भेट देणार
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील हाथरस येथे शुक्रवारी दौरा करणार आहेत. ही माहिती काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी तिरुवअनंतपुरम येथे गुरुवारी दिली. हाथरस येथील सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन १२१ जणांचा बळी गेला होता. ही अतिशय दुर्दैवी घटना होती, असेही ते म्हणाले. हाथरसमधील दुर्घटनेत जखमी झालेले लोक, मृतांचे नातेवाईक यांच्याशी राहुल गांधी संवाद साधतील.