दिल्लीत ‘मास्क ऑन’, प्रदूषणामुळे झाल्या शाळा बंद; डिझेल वाहनांना बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 08:41 AM2022-11-05T08:41:34+5:302022-11-05T08:41:42+5:30
प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. १० नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत दिवाळीनंतर प्रदूषणामुळे श्वास घेणे कठीण झाले आहे. शुक्रवारी सकाळी हवा गुणवत्ता निर्देशांक ४७२ वर पोहोचला. हा निर्देशांक ४५० च्या वर अत्यंत गंभीर आणि फुफ्फुसांसाठी धोकादायक मानला जातो. या वाढत्या प्रदूषणामुळे प्राथमिक शाळा शनिवारपासून बंद राहणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केली.
प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. १० नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. खराब हवेमुळे दिल्लीत निर्बधांचा चौथा टप्पा लागू करण्यात आला आहे. याअंतर्गत हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने दिल्ली-एनसीआरमध्ये डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी घातली. सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी नाही. नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये प्रशासनाने शुक्रवारपासून पहिली ते आठवीच्या मुलांसाठी ऑनलाइन वर्ग घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सचिवांना पाचारण
राष्ट्रीय हरित लवादाने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या मुख्य सचिवांना या विषयावर चर्चा करण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे की, समस्येचे निराकरण करण्यासाठी आतापर्यंत केलेल्या उपायांबद्दल लवाद समाधानी नाही.
केजरीवालांनी राजीनामा द्यावा : काँग्रेसची मागणी
केजरीवाल यांनी प्रदूषणामुळे त्वरित पदाचा राजीनामा द्यावा आणि जनतेची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. “दिल्ली हे जगातील एकमेव शहर असेल जिथे प्रदूषणामुळे शाळा आणि कार्यालये बंद करण्यात आली आहेत, असे ते म्हणाले.