पंतप्रधानांच्या निमंत्रणावरून वर्षअखेरीस पोप येणार होते भारत दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 08:23 IST2025-04-22T08:23:41+5:302025-04-22T08:23:54+5:30
कोलकात्यातील मिशनरीज ऑफ चॅरिटीसह देशातील विविध संस्था तसेच प्रदेशांना भेट दिली होती. मात्र, पोप पॉल चौथे हे भारत दौऱ्यावर येणारे पहिले पोप आहेत.

पंतप्रधानांच्या निमंत्रणावरून वर्षअखेरीस पोप येणार होते भारत दौऱ्यावर
नवी दिल्ली - पोप फ्रान्सिस हे पुढच्या वर्षी भारत भेटीवर येणार असल्याची चर्चा होती; पण त्यांचे सोमवारी निधन झाल्यामुळे ती शक्यता आता मावळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची २०२१ आणि २०२४ मध्ये भेट घेतली होती आणि त्यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले होते.
पोप फ्रान्सिस यांनी हे आमंत्रण स्वीकारले होते.
केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन गेल्या डिसेंबरमध्ये व्हॅटिकन सिटीला गेले होते. त्यांनी सांगितले की, पोप फ्रान्सिस नाताळमध्ये यंदाच्या वर्षी भारत दौऱ्यावर येणार होते; पण आता ते शक्य नाही. याआधी १९९९ साली पोप जॉन पॉल दुसरे हे भारतभेटीवर आले होते. त्यावेळी त्यांनी आशियाई बिशपांच्या विशेष अधिवेशनाच्या समारोप समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविले. त्यावेळी त्यांनी तत्कालीन उपराष्ट्रपती कृष्णकांत आणि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेतली. त्यापूर्वी १९८६ मध्येही पोप जॉन पॉल दुसरे भारत दौऱ्यावर आले होते. कोलकात्यातील मिशनरीज ऑफ चॅरिटीसह देशातील विविध संस्था तसेच प्रदेशांना भेट दिली होती. मात्र, पोप पॉल चौथे हे भारत दौऱ्यावर येणारे पहिले पोप आहेत.
नवे पोप निवडण्याच्या प्रक्रियेत भारतातील चार कार्डिनलचा सहभाग, प्रक्रियेकडे साऱ्या जगाचे लक्ष
पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेनुसार सिस्टीन चॅपेलमध्ये नव्या पोपच्या निवडीसाठी गुप्त मतदान (कॉन्क्लेव्ह) होणार आहे. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या कार्डिनलामध्ये भारतातील चार कार्डिनलही असणार आहेत. भारतामध्ये सध्या सहा कार्डिनल्स आहेत, पण ८० वर्षे वय असलेले कार्डिनल जॉर्ज आलेंचरी, कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेसियस वयोमर्यादेमुळे मतदान करू शकणार नाहीत. नवीन पोप कोण होणार याकडे आता साऱ्या जगाचे लक्ष लागलेले आहे. त्यात या मतदानासाठी पात्र असलेले चार भारतीय कार्डिनल्स याप्रमाणे आहेत.
कार्डिनल फिलीप नेरी फेराव (वय ७२) – गोवा आणि दमणचे आर्चबिशप. २७ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांची कार्डिनलपदी निवड झाली.
कार्डिनल क्लीमिस बासेलिओस (६४) – त्रिवेंद्रमचे मेजर आर्चबिशप व सायरो-मलंकारा कॅथोलिक चर्चचे कॅथोलिकोस. त्यांची २४ नोव्हेंबर २०१२ रोजी कार्डिनल म्हणून निवड झाली होती.
कार्डिनल अँथनी पुला (६३) – भारतातील पहिले मागास समाजातील कार्डिनल. वंचित मुलांच्या मदतीसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले आहे.
कार्डिनल जॉर्ज जेकब कूवाकड (५१) – केरळमधील सायरो-मलबारचे आर्चबिशप व व्हॅटिकनमधील मुत्सद्दी म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांची ७ डिसेंबर २०२४ रोजी कार्डिनल म्हणून निवड झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली दोनदा भेट
रोममध्ये आयोजिलेल्या जी२० परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासमवेत व्हॅटिकनमध्ये पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली होती. तेव्हा भारतभेटीचे निमंत्रण दिले होते. जून २०२४ मध्ये इटलीत झालेल्या जी७ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी या पोप फ्रान्सिस यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आणि भारतभेटीचे आमंत्रण पुन्हा दिले. गर्भपातविरोधी मोहीम पोप फ्रान्सिस यांच्या कार्यकाळात तीव्रपणे राबविण्यात आली नाही.
पोप फ्रान्सिस यांनी वयाच्या १७व्या वर्षी धर्मोपदेशक होण्याचा निर्णय घेतला आणि चार वर्षांनी सेमिनरीत दाखल झाले.