जमिनीनंतर नोकरीवर गदा येण्याची शक्यता; रेल्वे घोटाळ्यातील नोकरदारांवर टांगती तलवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 06:15 AM2022-05-23T06:15:06+5:302022-05-23T06:16:15+5:30
रेल्वेत नोकरीच्या मोबदल्यात जमीन घोटाळ्याचा आरोप असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना पुन्हा तुरुंगात जावे लागू शकते.
एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : रेल्वेमध्ये जमिनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणात केवळ लालूप्रसाद यादव यांचे कुटुंबीयच नाही तर ज्यांनी नोकरी मिळवली, तेही अडचणीत आले आहेत. नोकरीसाठी त्यांनी जमीन तर दिलीच; पण आता नोकरीही जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यावरील दोष सिद्ध झाला, जमीनही गेली आणि नोकरीही गेली, अशी त्यांची स्थिती होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. यात काही दस्तावेज व हार्ड डिस्क यांचाही समावेश आहे. जमीन देऊन नोकरी मिळविणाऱ्या १२ जणांनाही सीबीआयने आरोपी केले आहे. यात पाटण्याचे राजकुमार सिंह, मिथिलेश कुमार, अजय कुमार, संजय राय, धर्मेंद्र राय, विकास कुमार, पिंटू कुमार, दिलचंद कुमार, प्रेमचंद कुमार, लालचंद कुमार, अभिषेक कुमार व गोपालगंजचे हृदयानंद चौधरी यांचा समावेश आहे. सीबीआय या प्रकरणातील अन्य मुद्द्यांवर तपास करण्यात गुंतली आहे. या लोकांची कोणकोणत्या पदांवर कशा पद्धतीने नियुक्ती झाली आहे, याचीही चौकशी करण्यात येईल. याच बरोबर कुटुंबातील कोणत्या अन्य सदस्याच्या नावावरही जमीन करण्यात आली आहे का, याचाही तपास सुरू आहे.
लालूंच्या कुटुंबीयांच्याही नावे केली जमीन
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सात आरोपींनी लालूंना एक लाख वर्गफुटापेक्षा अधिक जमीन दिली आहे. या जमिनी माजी मुख्यमंत्री राबडीदेवी, त्यांच्या मुली मीसा भारती व हेमा यादव यांच्याही नावे करण्यात आल्या आहेत. गोपालगंज जिल्ह्याच्या इटवा गावातील रेल्वेमध्ये नोकरीत असलेल्या हृदयानंद याच्या घरी आढळलेल्या दस्तावेजांची छाननी केली जात आहे. त्याच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जात आहे. सीबीआय सर्व तथ्यांची सुसंगतवार मांडणी करण्यात गुंतली आहे.
लालूप्रसाद यांना पुन्हा होऊ शकतो तुरुंगवास?
रेल्वेत नोकरीच्या मोबदल्यात जमीन घोटाळ्याचा आरोप असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुुटुंबीयांतील काही सदस्यांची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) चौकशी करण्याच्या तयारीत असून लालूप्रसाद यादव यांना पुन्हा तुरुंगात जावे लागू शकते. सीबीआय लालूप्रसाद यांच्याव्यतिरिक्त माजी मुख्यमंत्री राबडी देवी, मिसा भारती आणि हेमा यादव यांची चौकशी करणार आहे. सीबीआयने १८ मे रोजी एफआयआर दाखल केल्यानंतर सीबीआयने शुक्रवारी लालूप्रसाद, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि अन्य आरोपींच्या १६ ठिकाणांवर धाडी टाकल्या होत्या.