देशातील १३ काेटी लाेकांची गरिबी हटली; नीति आयाेगाचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 12:39 PM2023-07-18T12:39:26+5:302023-07-18T12:40:02+5:30
नीति आयाेगाचा अहवाल, ग्रामीण भागात सर्वाधिक सुधारणा
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारताने पाच वर्षांमध्ये १३.५ काेटी लाेकांना बहुआयामी गरिबीतून बाहेर काढले आहे. नीति आयाेगाने सादर केलेल्या एका अहवालातून याबाबत माहिती देण्यात आली आहे. देशात गरिबांची संख्या ९.८९ टक्क्यांनी घटल्याचे अहवालात म्हटले आहे.
आयाेगाच्या उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी हा अहवाल सादर केला. भारताने वर्ष २०१५ ते २०१९ या पाच वर्षांमध्ये १३.५ काेटी लाेकांना बहुआयामी गरिबीतून काढले आहे. २०१५ मध्ये गरिबांची संख्या २४.८५ टक्के हाेती. ती २०१९-२१ यादरम्यान १४.९६ टक्क्यांवर आली, असे अहवालात म्हटले आहे. ग्रामीण क्षेत्रात गरिबांच्या लाेकसंख्येत सर्वाधिक घट आली आहे. स्वच्छता, पाेषण, पेयजल, वीज, घरगुती गॅसचा पुरवठा सुधारल्यामुळे परिस्थिती बदलल्याचे म्हटले आहे.
‘बहुआयामी गरिबी’
म्हणजे काय?
आराेग्य, शिक्षण आणि राहणीमान या तीन घटकांवरून गरिबीचे माेजमाप करण्यात येते. त्यांना सातत्यशील विकास उद्दिष्टांसाेबत जुळलेल्या १२ घटकांद्वारे दर्शविण्यात आले आहे.