प्रग्यानने ठोकले शतक, आता एक-दोन दिवसांत ‘झोपी’ जाणार...; १०० मीटर असा केला प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 09:08 AM2023-09-03T09:08:26+5:302023-09-03T09:08:34+5:30
चंद्रयान-३ मोहिमेतील विक्रम लँडर व प्रग्यान रोव्हर हे एक ते दोन दिवसांत झोपी जाणार आहेत.
श्रीहरिकोटा : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या प्रग्यान रोव्हरने त्याला नेमून दिलेली सर्व कामे पूर्ण केली असून, तो आता झोपी जाणार आहे, तसेच एपीएक्सएस, एलआयबीएस या पेलोडचे काम आता बंद करण्यात आले आहे, तसेच त्यांनी गोळा केलेली माहिती विक्रम लँडरमार्फत पृथ्वीवर पाठविली आहे, अशी माहिती इस्रोने शनिवारी दिली.
प्रग्यान रोव्हरची बॅटरी पूर्णपणे चार्ज आहे. चंद्रावर २२ सप्टेंबर रोजी दिवस उजाडेल, त्यावेळी प्रग्यान रोव्हरवरील सोलार पॅनेल सक्रिय होतील. त्याद्वारे मिळणाऱ्या ऊर्जेतून पुन्हा हा रोव्हर कार्यरत होईल, अशी आशा इस्रोने व्यक्त केली आहे. तसे न झाल्यास प्रग्यान रोव्हर हा भारताचा चंद्रदूत बनून कायम तिथे वास्तव्य करेल, अशी टिप्पणी इस्रोने केली आहे.
चंद्रयान-३ मोहिमेतील विक्रम लँडर व प्रग्यान रोव्हर हे एक ते दोन दिवसांत झोपी जाणार आहेत. चंद्रावर होणारी रात्र हा त्यांचा झोपेचा काळ असेल. चंद्राच्या पृष्ठभागावर प्रग्यान रोव्हरने विक्रम लँडरपासून १०० मीटर दूरवर भ्रमंती केली आहे, अशी माहिती इस्रोचे संचालक एस. सोमनाथ यांनी दिली. चंद्रावरील एका रात्रीचा कालावधी हा पृथ्वीवरील १४ ते १५ दिवसांइतका असतो. रोव्हर, लँडर झोपी गेल्यानंतर ते शास्त्रीय प्रयोग करणार नाहीत.