मणीपूरमध्ये मुख्यमंत्र्यांना हटवण्यासाठी दबाव वाढला, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 05:41 AM2023-07-22T05:41:46+5:302023-07-22T05:42:42+5:30
भाजप नेतृत्वाचा मात्र नकार
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर टिप्पणीनंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्यावर राजीनामा देण्याचा तीव्र दबाव असू शकतो; पण भाजप नेतृत्व किमान सध्या तरी त्यांचा राजीनामा घेण्यास इच्छुक नाही.
सत्ताधारी भाजपने संसदेत मणिपूरच्या परिस्थितीवर चर्चा करण्याची तयारी दर्शविली आणि पंतप्रधानांनी आपली वेदना आणि व्यथा व्यक्त केली; पण दोन कुकी महिलांना विवस्त्र फिरविल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असताना भाजप नेतृत्व मुख्यमंत्र्यांना हटवण्यास सहमत होण्याची शक्यता नाही.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनीही एकतर गुन्हेगारांवर कारवाई करा अन्यथा बाजूला हटा, न्यायालय कारवाई करेन, अशी टिप्पणी केली होती. भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरल्यामुळे पक्ष नेतृत्व विद्यमान मुख्यमंत्र्यांना हटवण्याची शक्यता नाही. एका विशिष्ट समाजाला एसटीचा दर्जा देण्याच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर सध्याचे संकट उद्भवल्याचे ते म्हणाले. एवढी वर्षे राज्यात पूर्ण शांतता आणि सलोखा होता आणि न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्रिया म्हणून हिंसाचार उसळला. प्रशासनाला सुरुवातीला याचा अंदाज आला नाही.