भारत अन् सौदी अरेबियाची मैत्री घट्ट; राजकुमार खेळू शकतात डाव, पाकिस्तानची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 08:44 AM2023-09-12T08:44:13+5:302023-09-12T08:57:19+5:30

जी- २० शिखर परिषद संपल्यानंतर सौदी अरेबियाचे राजकुमार सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत.

The Prince of Saudi Arabia is currently on a visit to India after the G-20 summit. | भारत अन् सौदी अरेबियाची मैत्री घट्ट; राजकुमार खेळू शकतात डाव, पाकिस्तानची चिंता वाढली

भारत अन् सौदी अरेबियाची मैत्री घट्ट; राजकुमार खेळू शकतात डाव, पाकिस्तानची चिंता वाढली

googlenewsNext

नवी दिल्ली: भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी प्रादेशिक आणि जागतिक कल्याण आणि स्थिरतेसाठी महत्त्वपूर्ण आहे. सौदी अरेबिया हा भारताचा सर्वात महत्त्वाचा व्यूहात्मक भागीदार असून बदलत्या काळानुसार दोन्ही देश त्यांच्या संबंधांमध्ये नवीन क्षितिजे जोडत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. भारत-सौदी अरेबिया व्यूहात्मक भागिदारी परिषदेच्या पहिल्या बैठकीत मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल-सौद यांच्यात चर्चा झाली. त्यादरम्यान त्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. 

भारत-सौदी अरेबिया व्यूहात्मक भागीदारी परिषदेची घोषणा २०१९ मध्ये महत्त्वाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. जी- २० शिखर परिषद संपल्यानंतर सौदी अरेबियाचे राजकुमार सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. चर्चेपूर्वी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सौदी अरेबियाच्या राजकुमारांचे अधिकृतपणे स्वागत करण्यात आले. जी-२० शिखर परिषद ही भारतासाठी मोठ्या यशाची शिखर परिषद होती. या शिखर परिषदेमुळे अनेक देशांशी जवळीक वाढली आहे, या यादीत पहिले नाव सौदी अरेबियाचे आहे. 

भारत आणि सौदी अरेबियाच्या मैत्रीमुळे चीन आणि पाकिस्तानची आतून घुसमट होत आहे. कारण या दोन देशांच्या वाढत्या जवळीकांमुळे आपण कुठेतरी दूर जाऊ शकतो, असे पाकिस्तानला वाटत आहे. अलीकडच्या काळात पंतप्रधान मोदी आणि राजकुमार मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल-सौद यांच्यात जी जवळीक वाढली आहे, त्याचा प्रभाव जगातील अनेक मोठ्या मंचांवर दिसून येत आहे. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आखाती देशांशी संबंध दृढ करण्यावर विशेष भर दिला असून, त्यात सौदी अरेबियासोबतचे संबंध सर्वाधिक सुधारले आहेत. पंतप्रधान मोदींनी २०१६ आणि २०१९ साली अशी दोनदा सौदी अरेबियाला भेट दिली आहे.

महाराष्ट्रात ४४०० कोटी रुपयांचा ‘वेस्ट कोस्ट रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स प्रकल्प’ उभारण्याची तयारी सुरू असून, त्यात सौदी अरेबियाची अरामको, अबुधाबी नॅशनल ऑईल कंपनी आणि भारताची इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन एकत्र काम करत आहेत. अलीकडेच सौदी अरेबियाने येत्या ५ वर्षांत पाकिस्तानमध्ये २५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. पण भारताशी वाढत्या जवळीकमुळे सौदी अरेबिया आपला निर्णय फिरवू शकतो, अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. कारण सौदी अरेबियाने या मुद्द्यावर दीर्घकाळ मौन बाळगले आहे.

आमची घनिष्ठ भागीदारी पुढील स्तरावर नेण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. आजची बैठक आमच्या संबंधांना नवी दिशा आणि ऊर्जा देईल.'
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

जी- २० शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी भारताचे अभिनंदन. परिषदेत केलेल्या घोषणांचा जगाला फायदा होईल. आम्ही दोन्ही देशांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी एकत्र काम करू.
-मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल-सौंद, सौदी अरेबियाचे राजकुमार

Web Title: The Prince of Saudi Arabia is currently on a visit to India after the G-20 summit.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.