देशाला गप्प बसवून प्रश्न सुटणार नाहीत! सोनिया गांधी यांचा केंद्र सरकारवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 11:48 AM2023-04-12T11:48:19+5:302023-04-12T11:48:46+5:30

काँग्रेस संसदीय समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर टीका केली.

The problems will not be solved by keeping the country silent says Sonia Gandhi | देशाला गप्प बसवून प्रश्न सुटणार नाहीत! सोनिया गांधी यांचा केंद्र सरकारवर घणाघात

देशाला गप्प बसवून प्रश्न सुटणार नाहीत! सोनिया गांधी यांचा केंद्र सरकारवर घणाघात

googlenewsNext

नवी दिल्ली :

काँग्रेस संसदीय समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर टीका केली. देशाला गप्प बसवून देशासमोरील प्रश्नांची सोडवणूक होणार नाही, असे त्या म्हणाल्या. पंतप्रधानांनी जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर मौन बाळगले आहे. त्यांच्या सरकारच्या कामकाजाचा कोट्यवधी लोकांच्या  जीवनावर परिणाम होताे. तथापि, मोठ्या मुद्द्यांवर जेव्हाही न्याय्य प्रश्न विचारण्यात येतो, तेव्हा पंतप्रधान त्यावर  मौन बाळगतात, असे त्यांनी म्हटले. 

एका लेखात सोनिया गांधींनी सरकारवर संसदेतील विरोधकांचा आवाज दाबणे, यंत्रणांचा गैरवापर करणे, माध्यमांचे स्वातंत्र्य संपवणे, देशात द्वेष, हिंसाचाराचे वातावरण निर्माण करणे, असे आरोप केले आहेत.

देशात द्वेष, हिंसाचाराचे वातावरण
भाजप व आरएसएसच्या लोकांनी देशात द्वेष व हिंसाचाराला प्रोत्साहन दिले असून, हे प्रमाण वाढले आहे.  पंतप्रधान त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, असे सोनिया गांधी म्हणाल्या. धार्मिक सण हे आता आनंदाचे व उत्सवाचे सण राहिलेले नाहीत तर इतरांना धमकाविण्याची, त्रास देण्याची संधी बनले आहेत, असेही त्या म्हणाल्या.

काँग्रेस समविचारी पक्षांशी युती करणार
राज्यघटनेच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष सर्व समविचारी पक्षांसोबत काम करण्यास तयार आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. सरकार भारतीय लोकशाहीचे तीनही स्तंभ विधिमंडळ, कार्यपालिका व न्यायपालिका नष्ट करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षांची एकजूट आवश्यक असल्याचे सांगताना राज्यघटना आणि आदर्शांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस समविचारी पक्षांसोबत युती करण्यास तयार आहे, असे त्या म्हणाल्या.

मला धमकावून तुम्ही रोखू शकत नाही : राहुल गांधी
‘भाजपने खासदारकीचे पद काढून घेतल्याने आपल्याला वायनाडच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्यापासून रोखता येणार नाही किंवा धमकावून प्रश्न उपस्थित करण्यापासून रोखता येणार नाही’, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथे केली. वायनाड मतदारसंघातील जाहीरसभेत गांधी बोलत होते. खासदार म्हणून अपात्र झाल्यानंतर मतदारसंघात ते पहिल्यांदाच आले होते. त्यांचे नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो लोकांनी उपस्थिती होती.

‘प्रश्न विचारतात म्हणून राहुल गांधी यांच्यावर संपूर्ण भाजपने निर्दयीपणे शाब्दिक हल्ले केले आणि पंतप्रधानांनाही त्यांची बदनामी करणे योग्य वाटते, कारण ते उत्तर देऊ शकत नाहीत. प्रश्न विचारणे आणि मुद्दे मांडणे हे संसद सदस्याचे कर्तव्य असते. खासदार म्हणून त्यांचे भवितव्य न्यायालयाच्या हाती आहे; पण ते प्रश्न विचारत राहतील’, 
- प्रियांका गांधी, काँग्रेस सरचिटणीस

Web Title: The problems will not be solved by keeping the country silent says Sonia Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.