पंक्चर कार फक्त ‘रिम’वर १२० च्या स्पीडने पळवली; पोलिसांनी २ किमी पाठलाग करून पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 09:47 AM2023-03-29T09:47:08+5:302023-03-29T09:47:12+5:30
तथापि, नेटकऱ्यांमध्ये ही विचित्र घटना व्हायरल झाली आहे.
कारचे टायर पंक्चर असूनही तब्बल १२० किमी प्रतितास भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्याला बंगळुरू पोलिसांनी २ किमी पाठलाग करून पकडले. पुढील डावे टायर पंक्चर होऊन निघाल्यानंतरही नितीन यादव (२७) फक्त चाकाच्या कड्यांवरच (रिम) कार भरधाव पळवत असल्याचे गस्तीवरील पोलिसांना दिसले. शनिवारी रात्री ३ च्या सुमारास, पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि मुनियप्पा सर्कलजवळ थांबवले. पोलिसांनी विचारल्यावर टायर निघाल्याचे माहितीच नव्हते, असे अजब उत्तर त्याने दिले.
सुदैवाने घटनेत कसलीही हानी झाली नाही; पण पोलिसांनी चालकाची वैद्यकीय चाचणी केली आणि दारू पिऊन, तसेच बेदरकारपणे वाहन चालवल्याबद्दल गुन्हा दाखल केला. ड्रायव्हिंग लायसन्स आणि ‘एमयूव्ही’ प्रकारातील कार जप्त करून कुटुंबीयांना बोलावून त्यांच्यासोबत पाठवले. त्याला जामिनावर सोडण्यात आले आहे, तथापि, नेटकऱ्यांमध्ये ही विचित्र घटना व्हायरल झाली आहे.