रस्ता खचला, खड्डा पडला, अनेक गाड्या आत पडल्या, मोदींनी वर्षभरापूर्वी उदघाटन केलेल्या पूर्वांचल एक्स्प्रेस वेची दैना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 01:07 PM2022-10-07T13:07:10+5:302022-10-07T13:09:01+5:30
Purvanchal Expressway: लखनौ येथून गाझीपूरला जोडणारा पूर्वांचल एक्स्प्रेस वे गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खचला आहे. रस्ता खचल्याने सुमारे १५ फुटांहून अधिक खोल खड्डा पडला आहे. रात्री पडलेल्या या खड्ड्यात पडून एक्स्प्रेस वे वरून जाणारी एक कार दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळत आहे.
लखनौ - उत्तर प्रदेशमधील सुल्तानपूरमध्ये पूर्वांचल एक्स्प्रेस वेच्या बांधकामावेळी करण्यात आलेल्या त्याच्या दाव्यांना फोल ठरवणारी घटना आज घडली आहे. लखनौ येथून गाझीपूरला जोडणारा पूर्वांचल एक्स्प्रेस वे गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खचला आहे. रस्ता खचल्याने सुमारे १५ फुटांहून अधिक खोल खड्डा पडला आहे. रात्री पडलेल्या या खड्ड्यात पडून एक्स्प्रेस वे वरून जाणारी एक कार दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळत आहे.
सध्या प्रशासनाकडून हा खड्डा रातोरात बुजवण्यात आला आहे. मात्र या खड्ड्यावरून यूपी काँग्रेसने ट्वीट करून सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच हा खड्डा सरकारच्या भ्रष्टाचाराचा पुरावा असल्याचे म्हटले आहे.
तब्बल २२ हजार कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या ३४० किमी लांब पूर्वांचल एक्स्प्रेस वेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ नोव्हेंबर २०२१ रोजी केलं होतं. या प्रकल्पामधून लखनौ, बाराबंकी, अमेठी, अयोध्या, सुल्तानपूर, आंबेडकरनगर, आझमगड, मऊ आणि गाझीपूरला जोडण्यात आले होते.
पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर आपातकालिन स्थितीमध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या लँडिंग आणि टेकऑफसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी सुल्तानपूर येथे ३.२ किमी लांब धावपट्टीही बांधण्यात आली आहे. दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या एक्स्प्रेस वेवर हलियापूर येथे अचानक रस्ता खचला आणि जवळपास १५ फूट खोल खड्डा पडला.
दरम्यान, प्रशासनाने त्वरित कारवाई करत रातोरात हा खड़्डा बुजवून रस्ता सुरळीत केला. या खड्यामुळे अनेक कार दुर्घटनाग्रस्त झाल्या. मात्र सुदैवाची बाब म्हणजे या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.