पीठासीन अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची, नरेंद्र मोदींचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 08:43 AM2024-01-28T08:43:51+5:302024-01-28T08:44:32+5:30
Narendra Modi : देशाच्या अमृत काळामध्ये जी उद्दिष्टे ठरवली आहेत. त्यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि विधिमंडळाची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
मुंबई : देशाच्या अमृत काळामध्ये जी उद्दिष्टे ठरवली आहेत. त्यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि विधिमंडळाची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे ८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी दृकश्राव्यद्वारे पंतप्रधान मोदी यांनी परिषदेला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधिमंडळांचे पीठासीन अधिकारी उपस्थित होते.
विधानमंडळे आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर
मोदी म्हणाले की, देशाची प्रगती तेव्हाच होईल, जेव्हा प्रत्येक राज्य प्रगती करेल. त्यासाठी विधिमंडळातील सर्व घटकांनी लक्ष्य निश्चित करून सामाजिक हित जोपासत सकारात्मक भावनेने कार्य करावे. सन २०२१ मध्ये ‘एक राष्ट्र, एक विधानमंच’ यावर मी विधान केले होते. संसद आणि राज्य विधानमंडळे आता डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून यावर काम करीत आहेत, हे ऐकून आनंद होत आहे.
ही स्थिती बरी नव्हे...
एक काळ असा होता की, जेव्हा सभागृहातील कोणत्याही सदस्यांनी शिष्टाचाराचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कारवाई केली जायची आता सदस्यांना पाठिंबा मिळतो ही परिस्थिती संसद असो वा विधानसभा, यासाठी चांगली नाही, अशी खंतही मोदी यांनी बोलून दाखविली.
बिर्ला म्हणाले...
देशातील विधानमंडळे जनतेच्या प्रति उत्तरदायी असून त्यातून लोकशाही अधिक सशक्त होण्यास मदत होते, भारतीय लोकशाही संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक असल्याचे गौरवोद्गार लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावेळी काढले.