शिवसेनेसारखीच युती तोडलेली! खुद्द अमित शहा भेटायला गेले, काय चाललेय 'विरोधकांच्या' राजकारणात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 11:41 AM2023-06-04T11:41:25+5:302023-06-04T11:42:09+5:30
२०१८ मध्ये वेगळा झालेल्या मित्र पक्षाला पुन्हा एकत्र घेण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरु झाले आहेत. अमित शहांची सुमारे तासभर बैठक...
देशभरात विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपविरोधात एकत्र येण्यासाठी रणशिंग फुंकले असताना तिकडे आंध्र प्रदेशमध्ये २०१८ मध्ये वेगळा झालेल्या मित्र पक्षाला पुन्हा एकत्र घेण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरु झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी सायंकाळी आंध्रचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली.
नायडू यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. जवळपास १ तास झालेल्या या चर्चेत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यानंतर दोन्ही पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येतील अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, टीडीपीच्या नेत्यांनी या भेटीवर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, भाजप सत्तेत येताच टीडीपीने 2018 मध्ये एनडीए सोडली. तर, आता पक्षाने अनेकवेळा भाजपसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आहे. ते जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा मजबूत करत आहेत. देशाला बळकट करण्याच्या या मार्गावर मला पंतप्रधान मोदींसोबत काम करायचे आहे, असे एकदा नायडू म्हणाले होते. 2018 मध्ये आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न दिल्याने नायडू केंद्रावर नाराज होते. त्यामुळे त्यांनी एनडीएशी संबंध तोडले होते. अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशकडे दुर्लक्ष करण्यात आले, यामुळे युती तोडत असल्याचे कारण नायडू यांनी दिले होते.
काय होईल...
दोन्ही पक्षांमध्ये युती झाल्यास भाजप आंध्र प्रदेशसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाय पसरवू शकतो. तेलंगणात विरोधी पक्ष म्हणून टीडीपी मजबूत आहे. टीडीपी आंध्र प्रदेशात उच्चवर्णीयांच्या पाठिंब्यासाठी संघर्ष करत आहे, भाजपामुळे हा गट टीडीपीला मिळेल.