Crime: वाळू माफियांनी खाण इन्स्पेक्टरसह जवानांवर टाकलं पेट्रोल, जिवंत जाळणार तेवढ्यात...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 10:08 AM2023-02-23T10:08:57+5:302023-02-23T10:09:43+5:30
Crime News: वाळू माफियांनी खाण इन्स्पेक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांवर पेट्रोल टाकले आणि त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हे अधिकारी जीव वाचवून कसेबसे तिथून सटकले.
बिहारमधील छपरा जिल्ह्यात वाळूमाफियांनी खाण इन्स्पेक्टरला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. खाण इन्स्पेक्टर काल रात्री सोनपूरजवळ बेकायदेशीर वाळू वाहतुकीची तपासणी करत होते. त्यावेळी त्यांनी एक ट्रक पकडला. मात्र तेवढ्यात बोलेरोमधून वाळू माफिया तिथे पोहोचले. त्यांनी अचानक हल्ला केला. यादरम्यान, एक सॅप जवान जखमी झाला. त्यानंतर या वाळू माफियांनी खाण इन्स्पेक्टर अंजनी कुमार आणि इतर कर्मचाऱ्यांवर पेट्रोल टाकले आणि त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हे अधिकारी जीव वाचवून कसेबसे तिथून सटकले.
यादरम्यान, वाळू माफिया ट्रक घेऊन फरार झाले. याप्रकरणी सोनपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री सोनपूरच्या शिव बचन सिंह चौकाजवळ सारणचे खाण निरीक्षक अंजनी कुमार यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न खाण माफियांनी केला. या प्रकरणी खाण निरीक्षक अंजनी कुमार यांनी सोनपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या तक्रारीत त्यांनी सांगितले की, मी शिवबचन सिंह चौकात चेकपोस्ट जवळ वाहनांची तपासणी करत होते. यादरम्यान, एक दहा चाकी ट्रक थांबवला. पोलिसांना पाहताच ट्रकचालक ट्रक सोडून पळाला. तपास केला असता ट्रकमध्ये ओव्हरलोड वाळू भरलेली असल्याचे आढळले. त्यानंतर ट्रकवर जप्तीची कारवाई करण्यात येत असताना बोलेरोमधून पाच जण तिथे पोहोचले. त्यांनी ट्रकची चावी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खाण निरीक्षकही तिथे पोहोचले.
त्यांना पाहताच वाळू माफियांनी सॅप जवानांवर आणि वाळू माफियांवर लाठ्या काठ्या मारण्यास सुरुवात केली. त्यात एक जवान जखमी झाला. तेवढ्यात वाळू माफियांनी खाण निरीक्षक आणि त्यांच्या गाडीवर पेट्रोल टाकूनी पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र खाण निरीक्षकांनी प्रसंगावधान राखत तिथून काढता पाय घेतला आणि जीव वाचवला.