रेल्वेचा वेग हाेणार ताशी २२० किमी! वंदे भारतही पडणार मागे, ५९ किलाेमीटरचा टेस्टिंग ट्रॅक हाेताेय तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 07:18 AM2023-04-15T07:18:11+5:302023-04-15T07:18:16+5:30
भारतात वंदे भारत एक्स्प्रेस ही सर्वांत वेगवान रेल्वे विविध मार्गांवर सुरू करण्यात आली आहे.
नवी दिल्ली :
भारतात वंदे भारत एक्स्प्रेस ही सर्वांत वेगवान रेल्वे विविध मार्गांवर सुरू करण्यात आली आहे. आता वंदे भारतपेक्षा जास्त वेगाने रेल्वे चालविण्याची तयारी भारतीय रेल्वेने सुरू केली आहे. या गाड्या ताशी २२० किमी एवढ्या वेगाने चालविण्याचा प्रयत्न असून त्यासाठी राजस्थानमध्ये टेस्टिंग ट्रॅक विकसित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यावर सध्याच्या राेलिंग स्टाॅकचीही चाचणी शक्य हाेणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अशी सुविधा असलेला भारत पहिलाच देश ठरणार आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस ताशी १८० किलाेमीटर एवढ्या वेगाने चाचणीदरम्यान धावली हाेती. ही गाडी सेमी हायस्पीड या श्रेणीमध्ये येते. भविष्यात ताशी २२० किमी वेगाने रेल्वे चालविण्याची याेजना आहे.
असा असेल ट्रॅक
२३ किमीचा हाय स्पीड मेन ट्रॅक राहणार आहे.
१३ किमी हायस्पीड लूप ट्रॅक गुढा येथे असेल.
३ किमीचा जलद टेस्टिंग लूप नवा येथे राहणार आहे.
२० किमीचा कर्व्ह टेस्टिंग लूप उभारण्यात येईल.
या गाड्यांच्या चाचणीसाठी जाेधपूर विभागात गुढा-थथना मीठडी या दरम्यान ५९ किलाेमीटरचा टेस्टिंग ट्रॅक तयार करण्यात येत आहे. त्याचा पहिला टप्पा यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण हाेणार असून, २०२४ च्या अखेरपर्यंत दुसरा टप्पादेखील पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
अशी हाेईल चाचणी
- या टेस्ट ट्रॅकवर रेल्वे धावताना सर्व सुरक्षेचे मापदंड तपासण्यात येतील. त्यात स्टॅबिलिटी, व्हील ऑफलाेडिंग, ट्रॅक ओव्हरहेड इक्विपमेंट तसेच सिग्नलिंग यंत्रणांचा समावेश राहील.
राेलिंग स्टाॅक म्हणजे काय?
रेल्वेमध्ये नियमितपणे वापरण्यात येत असलेले काेच तसेच डब्यांना राेलिंग स्टाॅक म्हटले जाते. प्रवासी आणि माल गाडीचे डबे याचाच भाग आहेत. हाय स्पीड ट्रॅकवर यांचीही चाचणी रेल्वे करणार आहे.
भारतीय रेल्वेकडून येणाऱ्या काळात ॲल्युमिनियमचा वापर करून १०० ‘वंदे भारत’ची निर्मिती केली जाणार आहे. सध्या स्टेनलेस स्टीलपासून रेल्वे
बनविण्यात येतात. ॲल्युमिनियमच्या गाड्या वजनाने हलक्या राहतात. त्या सहज ताशी २०० किमी वेगाने धावू शकतात.
ताशी २२० किमी वेगाने चाचणी पुरेसी नाही. सर्वप्रथम मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-हावडा यासारख्या प्रमुख मार्गांवर ट्रॅक अपग्रेड करण्याची गरज आहे. - सुधांशू मणि, रचनाकार, वंदे भारत एक्स्प्रेस