५ हजार फूट उंचीवर असताना केबिनमध्ये धूर निघाल्याने स्पाईस जेटचे विमान माघारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 05:15 IST2022-07-03T05:14:44+5:302022-07-03T05:15:07+5:30
दिल्लीहून जबलपूरला जाणाऱ्या विमानातील घटना, विमानाने सुरक्षित लँडिंग केले. सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

५ हजार फूट उंचीवर असताना केबिनमध्ये धूर निघाल्याने स्पाईस जेटचे विमान माघारी
नवी दिल्ली : दिल्लीहून जबलपूरला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाच्या केबिनमध्ये अचानक धूर निघू लागल्याने हे विमान दिल्लीला माघारी आले.
प्राप्त माहितीनुसार, विमान हवेत ५ हजार फूट उंचीवर असताना केबिनमध्ये धूर निघत असल्याचे विमान कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पायलटना त्याबाबत सांगितले. त्यानंतर विमान तातडीने दिल्लीकडे परत फिरविण्यात आले. विमानाने सुरक्षित लँडिंग केले. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. त्यांना पर्यायी विमानाने जबलपूरला पाठविण्यात आले. विमानात किती प्रवासी होते, याची माहिती कळू शकली नाही.
हवाई वाहतूक नियंत्रक ‘नागरी उड्डयन महाचालकां’नी (डीजीसीए) म्हटले आहे, स्पाईसजेटच्या क्यू ४०० विमानाच्या इंजिनमध्ये तेलाची गळती झाल्यामुळे धूर निघाला असावा, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मागील दोन आठवड्यांत स्पाईसजेटच्या विमानाबाबतीत घडलेली ही अशा प्रकारची पाचवी घटना आहे.
यापूर्वींही इमर्जन्सी लँडिंग
१९ जून रोजी पाटणा विमानतळावरून दिल्लीला जाण्यासाठी १८५ प्रवाशांसह उडालेल्या स्पाईसजेटच्या विमानात उड्डाणानंतर लगेच आग लागली होती. त्यानंतर विमानाने काही मिनिटांतच इमर्जन्सी लँडिंग केले होते. पक्षी धडकल्यामुळे विमानाच्या इंजिनला आग लागली होती, असे समजते. १९ जून रोजी जबलपूरला निघालेले एक विमान ‘केबिन दबावा’च्या समस्येमुळे दिल्लीला परत आणले गेले होते.
२४ आणि २५ जून रोजी दोन विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते.