एकाच मंचावरून विरोधी पक्षांतील दिग्गजांची गर्जना; नितीश कुमारांनी सांगितला भाजपला हरवायचा फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 07:18 PM2022-09-25T19:18:20+5:302022-09-25T19:20:03+5:30
यावेळी भाजपवर निशाणा साधताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, 'आज बिहारमध्ये 7 पक्ष एकत्रितपणे काम करत आहेत. 2024 च्या निवडणुकीत त्यांना (भाजपला) जिंकण्याची कुठलीही संधी नाही.’
हरियाणातील फतेहाबाद येथे रविवारी विरोधी पक्षांतील दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर आले होते. निमित्त होते माजी उपपंतप्रधान देवी लाल यांच्या 109 व्या जयंती सोहळ्याचे. यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, जेडी(यू) नेते तथा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आरजेडी नेते तथा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, शिरोमणी अकाली दलाचे एसएस बादल आणि सीपीआय(एम)चे सीताराम येचुरी उपस्थित होते. INLD चे अध्यक्ष ओपी चौटाला यांच्या निमंत्रणावरून हे सर्व नेते येथे एकत्रित आले होते.
यावेळी भाजपवर निशाणा साधताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, 'आज बिहारमध्ये 7 पक्ष एकत्रितपणे काम करत आहेत. 2024 च्या निवडणुकीत त्यांना (भाजपला) जिंकण्याची कुठलीही संधी नाही.’
‘तिसऱ्या मोर्चाचा प्रश्नच नाही’ -
नितीशकुमार म्हणाले, 'मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही. तसेच, तिसर्या आघाडीचा प्रश्नच येत नाही. काँग्रेससह एकच आघाडी असेल, तर आपण 2024 मध्ये आपचा पराभव करू शकतो. एवढेच नाही, तर मी काँग्रेससह सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करेन आणि तरच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा (भाजप) पराभव होईल, असेही नितीश यावेळी म्हणाले.
‘आता एनडीए नहीच’ -
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी यावेळी एनडीएवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘आता एनडीए राहिलेले नाही; शिवसेना, अकाली दल आणि जेडी (यू) सारखे भाजपचे सहकारी लोकशाही वाचविण्यासाठी एनडीएतून बाहेर पडले आहेत.’
‘सर्वांनाच काम करण्याची वेळ आली आहे’ -
यावेळी एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, ‘2024 मध्ये सरकार बदलण्याच्या दृष्टीने सर्वांनाच काम करण्याची संधी आली आहे.’ शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन केले. मात्र, सरकारने त्याकडे बराचवेळ लक्ष दिले नाही. सरकारने शेतकरी नेत्यांवरील गुन्हे परत घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, ते पूर्ण केले नाही.'